
– अभिजित मुखोपाध्याय
विविध अभ्यासांवरून असे स्पष्ट होते की, सध्या आपली हिस्सेदारी जागतिक अंतरिक्ष बाजारपेठेत अवघी दोन ते तीन टक्के एवढीच आहे. आपण या क्षेत्रात आपल्याकडील स्टार्टअप कंपन्यांवरच अवलंबून राहणार आहोत की बाहेरच्या काही बडय़ा कंपन्यांना आमंत्रितही करणार आहोत, हेही ठरवावे लागेल. काही बडे हिंदुस्थानी गुंतवणूकदार अंतरिक्षाच्या क्षेत्रात गुंतवणूक करतील, अशीही शक्यता आहे.
अंतरिक्ष क्षेत्राचा आंतरराष्ट्रीय विस्तार पाहता त्यातील आपली हिस्सेदारी वाढविण्यासाठी हिंदुस्थान करीत असलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत. या क्षेत्रातील अनेक दशकांचा आपला व्यापक अनुभव आणि यश यामुळे या प्रयत्नांना मोठा आधार मिळाला आहे. अंतरिक्ष क्षेत्राचा विचार ‘अपस्ट्रीम’ आणि ‘डाऊनस्ट्रीम’ अशा दोन विभागांत केला जातो. ‘अपस्ट्रीम’ विभागात मुख्यत्वे उत्पादनविषयक घडामोडी येतात. उदाहरणार्थ, उपग्रह तयार करणे, प्रक्षेपकाची निर्मिती, संबंधित सुटे भाग तयार करणे, सहाय्यभूत तंत्रज्ञानाची निर्मिती इ. ‘डाऊनस्ट्रीम’ या विभागात सेवांचा समावेश केला जातो. उदाहरणार्थ, सॅटेलाईट टीव्ही, दूरसंचार, रिमोट सेन्सिंग, जीपीएस, इमेजरी इत्यादी. सध्या मुख्यत्वे डाऊनस्ट्रीम विभागावर लक्ष पेंद्रित केले जात आहे, परंतु प्रक्षेपण आदी घटकांकडेही लक्ष आहे. याचे प्रमुख कारण असे की, उत्पादनाला प्राधान्य देण्याइतके आर्थिक बळ भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेकडे (इस्रो) नाही. महागाई ध्यानात घेतली तर यासाठी करण्यात येणाऱ्या तरतुदीत आणखी कपात होण्याची चिन्हे आहेत. उपग्रह दूरसंचार, रिमोट सेन्सिंग आदी सेवा क्षेत्रात खासगी क्षेत्राची भागीदारी आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन द्यावे आणि त्यांनी इस्रोबरोबर सहकार्य करून जागतिक बाजारात हिंदुस्थानचा हिस्सा वाढवावा, असे सरकारचे धोरण आहे.
अशा प्रयत्नांमधून इस्रोकडे जो पैसा येईल, त्यातून उत्पादन आणि प्रक्षेपणाच्या क्षेत्रात स्थिती मजबूत करण्यास इस्रोला मदत मिळेल. आपल्या देशात अंतरिक्ष क्षेत्रात जे स्टार्टअप्स आले आहेत किंवा येत आहेत, त्यांना अशा गोष्टींमध्ये उल्लेखनीय क्षमता मिळविण्यास बराच कालावधी जावा लागेल. त्यामुळे याबाबतीत इस्रो खूपच आघाडीवर आहे, परंतु ज्या खूप उच्चस्तरीय ग्राहक सेवा आहेत, त्यांची मागणी वाढत चालली आहे. या क्षेत्रात धोरणात्मक निर्णय आणि खासगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे चांगले परिणाम दिसून येऊ शकतील.
पृथ्वीवर क्षेपणास्त्र आणि उपग्रह मॉनिटरिंग, डाटा अॅनालिसिस आदींशी संलग्न असणाऱ्या नेटवर्प, नियंत्रण कक्ष, डिश, टर्मिनल, डिजिटल रेडिओ, नेव्हिगेशन आदी हार्डवेअरची पूर्तता करण्याच्या क्षेत्रात खूप मोठय़ा शक्यता दिसतात. या क्षेत्रात खासगी उद्योगांच्या प्रवेशामुळे आपल्याला मोठी बाजारपेठ मिळण्याची मोठी शक्यता आहे. अंतरिक्ष उद्योगाची सध्याची बाजारपेठ 447 अब्ज डॉलर एवढय़ा आकाराची आहे, परंतु या क्षेत्रातील आपल्या स्टार्टअप कंपन्यांमधील गुंतवणूक 20 ते 22 दशलक्ष डॉलर एवढीच आहे, परंतु या आकडेवारीवरून निराशाजनक निष्कर्ष काढण्याची घाई करता कामा नये.
सध्या महामारीचा काळ सुरू असतानाच अंतरिक्ष उद्योगात कार्यरत कंपन्यांचा विस्तार सुरू झाला आहे. नजीकच्या भविष्यात या कंपन्यांमधील गुंतवणुकीत नक्की वाढ होईल. जागतिक अंतरिक्ष बाजारपेठेत आपली हिस्सेदारी वाढविण्यासाठी सरकारला काही कायदे, तरतुदी, नियम आदी तयार करण्याच्या मुद्दय़ांवरही विचार करावा लागेल. अंतरिक्ष क्षेत्राचा थेट संबंध राष्ट्रीय सुरक्षिततेशी होता. त्यामुळे हे क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी अद्याप खुले करण्यात आलेले नव्हते. इस्रोने सोडलेले उपग्रह आणि अन्य सेवांचा वापर तर संरक्षण क्षेत्राकडूनही केला जातो. भू-राजकीय परिस्थिती पाहता असे करणे गरजेचेही आहे. व्यावसायिक विस्ताराच्या पैलूपासून ही गोष्ट वेगळी कशी करता येईल याविषयी विचार केला गेला पाहिजे. हा एक कायदेशीर प्रश्न आहे.
सरकारने सुरुवात केल्यास या क्षेत्रात शक्यतांचे दरवाजे निश्चितपणे खुले होतील आणि तंत्रज्ञान तसेच गुंतवणूक यांचा विस्तार होईल. त्याचबरोबर रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील, परंतु अनेक विश्लेषकांप्रमाणेच मीही असे मानतो की, जागतिक बाजारपेठेत दहा टक्क्यांच्या हिस्सेदारीचे लक्ष्य महत्त्वाकांक्षी ठरेल. विविध अभ्यासांवरून असे स्पष्ट होते की, सध्या आपली हिस्सेदारी जागतिक अंतरिक्ष बाजारपेठेत अवघी दोन ते तीन टक्के एवढीच आहे. आपण या क्षेत्रात आपल्याकडील स्टार्टअप कंपन्यांवरच अवलंबून राहणार आहोत की बाहेरच्या काही बडय़ा कंपन्यांना आमंत्रितही करणार आहोत हेही ठरवावे लागेल. काही बडे हिंदुस्थानी गुंतवणूकदार अंतरिक्षाच्या क्षेत्रात गुंतवणूक करतील अशीही शक्यता आहे. अखेरीस बाजारात स्पर्धा होईल आणि परस्पर सहकार्याच्याही संधी मिळतील. यात परदेशी अंतरिक्ष कंपन्यांचा समावेशही नक्कीच असेल. जर सरकारचे प्रयत्न आणि खासगी क्षेत्रातील उद्योजकता यशस्वी ठरली तर दूरसंचाराच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेला आणि वापराला चालना मिळेल. भविष्यातील अर्थव्यवस्थेचा हाच आधार असेल. याखेरीज विविध प्रकारच्या उपकरणांची निर्मिती आणि संबंधित घडामोडींची बाजारपेठही मोठी असेल. या अनुभवांचा लाभ अंतरिक्ष क्षेत्राव्यतिरिक्त अन्य काही क्षेत्रांमध्येही घेता येईल. नवीन प्रकारच्या रोजगारसंधी निर्माण होतील, परंतु यासाठी आपल्याला अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
2017 मध्ये सरकारने अंतरिक्ष क्षेत्रातील घडामोडींवर आधारित एका विधेयकाचे प्रारूप प्रस्तुत केले होते. ते अद्याप संसदेत सादर करण्यात आलेले नाही. आता त्याला कायद्याचे रूप दिले जाणे गरजेचे आहे. कारण अंतरिक्षाचे क्षेत्र खुले केले जात आहे. राष्ट्रीय सुरक्षिततेव्यतिरिक्त व्यापार वाढविण्याबरोबरच अन्य क्षेत्रांप्रमाणेच याही क्षेत्रात विवाद होतील हे मुद्दे गृहितच धरले पाहिजेत. त्यांचा निपटारा करण्यासाठी कायदेशीर आधार तयार असायला हवा. अन्य क्षेत्रांमध्ये नियामक किंवा प्राधिकरणे तयार करण्यात आली आहेत. हे नियामक किंवा प्राधिकरणे त्या-त्या क्षेत्रांतील घडामोडींवर नजर ठेवतात आणि वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी करतात. अशाच एखाद्या ठोस व्यवस्थेची आवश्यकता अंतरिक्षाच्या क्षेत्रातही असेल. हे करणे अवघड नाही. कारण सरकारने काही महत्त्वाचे हिस्से वगळता संरक्षणाच्या क्षेत्रातही खासगी आणि परदेशी गुंतवणुकीला आमंत्रण दिले आहे. त्यातील नियम आणि रूपरेषेवरून संरक्षण क्षेत्रासाठीही व्यवस्था केली जाऊ शकते. हिंदुस्थान अंतरिक्ष सुरक्षिततेच्या क्षेत्रातही सक्रिय आहे. अंतरिक्ष व्यवसायातील या पैलूकडेही लक्ष दिले पाहिजे.
(लेखक अर्थतज्ञ आहेत)



























































