अभिजीत साटम… यशस्वी नाट्यनिर्माता ! त्याचं ९वं नाटक येतंय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>शिबानी जोशी<<

अभिजीत साटम या तरुण निर्मात्याचं ९वं नाटक आता रंगमंचावर येतंय. ‘बाय बाय बायको’. या भन्नाट विनोदी नाटकातून सोनाली खरे ही अभिनेत्री प्रथमच रंगमंचावर येतेय.

नाट्य क्षेत्र आता पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये. पूर्वी सर्वस्वी नाटकाला वाहिलेल्या कंपन्या होत्या. त्या जाऊन नाट्य निर्मिति संस्था आल्या. हळूहळू ज्याच्याकडे पैसा आहे तो नाटकात पैसा ओतून निर्माता होऊ लागला. पण अभिजीत साटम असा निर्माता आहे, जो वयाच्या २०व्या वर्षीच अपघाताने निर्माता झाला आणि त्याला ते क्षेत्र आवडल्यामुळे नाटकातील नफा-तोटा याचा विचार न करता सतत वैविध्यपूर्ण नाटकं निर्मितो आहे. मुंबईतल्या एम. डी. कॉलेजमध्ये शिकत असताना वेगवेगळ्या नाट्यस्पर्धांत भाग घेत असताना त्यांचा नाटकासाठी वाहून घेतलेला मस्त ग्रुप तयार झाला होता. अनेक स्पर्धांत बक्षीस घेतल्यावर त्यांना असं वाटू लागलं नाटक घेवून निर्मात्याकडे फिरण्यापेक्षा आपणच नाटक प्रोडय़ुस का करू नये… म्हणून घरच्यांचं विशेष आर्थिक पाठबळ न घेता संतोषसारख्या काही मित्रांनी एकत्र येऊन त्यांनी पहिलं नाटक प्रोडय़ुस केलं, ‘मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी’.

ते नाटक खूप चाललं. व्यावसायिकदृष्टय़ाही चांगलं चाललं. त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. नाटकाची नशा असते. ती एकदा चढली की ते व्यसन लवकर सुटत नाही. पहिलं नाटक हिट झालं, त्याला अनेक पुरस्कार मिळाले, ७५० प्रयोग झाले. त्यामुळे नाटक निर्मितीची नशा चढली आणि मग त्यानी ‘मेकअप’, ‘संगीत लग्नकल्लोळ’, ‘सख्या’ ही नाटकं बनवली. सुहास जोशी, स्मिता तळवलकर, भारती आचरेकरसारखे मोठे कलाकार घेवून एक उडी घेतली. ‘संगीत लग्नकल्लोळ’ हे बऱयाच वर्षानी संगीत नाटक रंगभूमीवर आलं… आणि प्रेक्षकांनीही छान उचलून धरलं. मग ‘मिस्टर ऍण्ड मिसेस’, ‘एक शून्य तीन’, ‘सुसाट’, ‘स्ट्राबेरी’ अशी ८ नाटकं झाली.

मधल्या कालात डॉक्युमेंट्री, शॉर्ट फिल्म्स, अगाडी, ‘हापूस’सारखा मराठी सिनेमाही त्यांनी केला. अर्थात रंगभूमीचं प्रेम काही न्यारंच असतं. त्यामुळे पुन्हा एकदा थोडय़ा गॅपनंतर अभिजीत नववं, नवं नाटक घेऊन येतोय. नाटकात कलाकार म्हणून काम करत असताना निर्माता म्हणून विशेष अनुभव नव्हता, पण तो करता करताच मिळाला आणि नाटक हे टीम वर्क आहे. कलाकार, बॅक स्टेज आर्टिस्टपासून सर्वांशी कस वागायचं याचं प्रत्यक्ष ज्ञान लहान वयातच निर्माता बनल्यामुळे मिळाल्यामुळे पहिल्या पिढीतला निर्माता असूनही १५ वर्षांत ९ नाटकं निर्माता म्हणून त्याला सादर करता आली.

आज नाटक व्यवसाय कितीही रिस्की झाला असेल, पण त्याकडे एक पॅशन एक फोकस ठेवून पाहिलं तर तोही आपण उत्तम करू शकतो. म्हणून आपण सातत्याने वेगवेगळे प्रकार हाताळणारी नाटकं करतो असे अभिजीतच म्हणणे आहे.