
>> अभिराम भडकमकर
काळाच्या ओघात अनेक शब्द नष्ट होतात, नाहीसे होतात. रोजच्या जीवनात त्यांचा संबंध न आल्याने काहीएक वर्षांनी हे शब्द शब्दकोषातून बाहेरच पडलेत की काय असे वाटते. असे अनेक शब्द, म्हणी, वाक्प्रचार आहेत ज्यांचा अर्थ लागत नाही. पुढे जाताना त्यांचा प्रवास तिथेच थांबलेला असतो.
अनेकदा नाटक पुनर्जीवित आहे असं म्हटलं जातं. म्हणजे काय, तर पूर्वी येऊन गेलेलं, बऱ्यापैकी लोकांचा प्रतिसाद मिळालेलं नाटक पुन्हा रंगमंचावर बऱ्याच वर्षांनी सादर झालं की, त्याला पुनर्जीवित नाटक असं म्हणतात, पण नाटक एकदा पुस्तक रूपाने प्रकाशित झालं की, ते कायमस्वरूपी असतं. म्हणजे जिवंत राहतं. त्याला कसलं आलंय पुनरुज्जीवन? असा प्रश्न कधी कधी मला पडायचा, पण एक नाटक जेव्हा पुनर्जीवित होतं तेव्हा काय काय गाडलेलं गेलेलं असतं काळाच्या पोटात ते पुन्हा वर येतं.
मध्ये एकदा अशाच पुनर्जीवित नाटकाची तालीम पाहायला गेलो होतो. तिथे दिग्दर्शक आणि कलावंत दोघेही तरुण असल्यामुळे एका गोष्टीबद्दल चर्चा चाललेली होती. ‘सूप वाजलं’ असा शब्द होता तर त्या दिग्दर्शकाला ‘सूप वाजले’ या शब्दाचा अर्थच माहीत नव्हता. त्यामुळे तो थोडा गोंधळला होता आणि त्याहीपेक्षा त्याहीपेक्षा गमतीदार परिस्थिती म्हणजे तो अभिनेता इतका तरुण होता की, त्याला ‘सूप’ हा शब्द फारसा कळत नव्हता. सूप म्हणजे टोमॅटो सूप वगैरे त्याला माहिती होती. त्यानं सूप पाहिलंच नव्हतं. मग मी त्या दोघांना ‘सूप वाजणे’ याचा अर्थ समजावून सांगितला. …आणि मग काळीज ‘सुपाएवढं’ झालं वगैरे वाक्प्रचार सांगितले.
सूप नावाचं स्वयंपाकघरांमधलं एक महत्त्वाचं साधन असायचं हे समजून सांगितलं आणि मला खूप गंमत वाटली. काळाच्या ओघामध्ये अनेक गोष्टी नष्ट होणार, नाहीशा होणार. कारण रोजच्या जीवनामध्ये जर त्यांचा संबंध आला नाही, त्यांच्याबद्दल बोललं गेलं नाही तर त्यांचा विसर पडणारच ना. त्या अभिनेत्याचाही काही दोष नव्हता. आपल्याला तरी किती असे अनेक शब्द आहेत, असे अनेक वाक्प्रचार आहेत, म्हणी आहेत, ज्याचे अर्थ लागत नाहीत, जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आले नाहीत. उदाहरणार्थ, कानेटकरांनीच असं एका ठिकाणी म्हटलं होतं की, त्यांच्या एका नाटकामध्ये ‘कोळशाची वखार’ असा शब्द आहे. आता कोळसा आणि त्याची वखार हे तरुण पिढीला कुठे आलंय कळायला?
त्यांनी त्या वेळेला असं म्हटलं होतं की, माझी नाटके कालबाह्य होत चाललीत का? पण मला असं वाटतं की, तपशील डेटेड होतात. मूळचा जो त्याचा गाभा आहे तो कधीच आऊटडेटेड होत नाही. कारण कानेटकरांसारख्या नाटककरांनी जे लिहून ठेवलेलं असतं त्याचा गाभा हा युनिव्हर्सल असतो, वैश्विक असतो, पण तपशील बदलू शकतात. आता चेकाव्हच्या नाटकांमध्ये किंवा इब्सेनच्या नाटकांमध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की, ज्या तरुण पिढीला कदाचित आश्चर्यकारक वाटतील.
लँडलाइनचा फोन ही इतकी महत्त्वाची वस्तू किंवा पात्रच आपल्या नाटकात असायचा. फोन आज अपडेट झालेला आहे. मग पत्र कमी झाली आहेत, एसटीडीचा बूथ आज फार कमी दिसतो. तार करणं आणि तार येणं! तार येणं हा किती नाट्यमय प्रसंग असायचा. पण तार, टेलिग्राम हे पात्रच आज संपलेलं आहे, असं म्हणावं लागेल. तर अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या तपशील असल्यामुळे संपतात, पण गाभा नष्ट होत नाही. जे नाटक त्या मुलांना आवडत होतं ते नाटक त्या मुलांना आपलं आणि आजचं वाटत होतं, पण सूप, तार वगैरे अशा पद्धतीचे शब्द, अशा अनेक गोष्टी त्यांना खटकत होत्या. सांगितल्यानंतर त्यांना फार गंमत वाटली आणि त्यांनी त्या खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये समाविष्टही केल्या.
पण ‘सूप’ असं म्हटलं की, माझ्या डोळ्यांसमोर एक वेगळंच सूप येतं आणि एक वेगळाच प्रसंग येतो. पीटर ब्रुक्स आपलं ‘महाभारत’ नावाचं जगप्रसिद्ध नाटक हिंदुस्थानात घेऊन आले होते आणि त्यांनी चार शहरांमध्ये एक कार्यशाळाही घेतली होती. त्यात त्या नाटकातले नट भेटायचे, त्यांच्याशी चर्चा व्हायच्या आणि मग त्या नाटकावरच आधारित त्याच नटांना घेऊन केलेला जो चित्रपट होता तो चित्रपट दाखवला जायचा. मग त्याच्यावर चर्चा. असाच चित्रपट पाहून भारावलेले आम्ही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातले विद्यार्थी पीटर ब्रुक्स यांच्या कार्यशाळेत बसलो होतो आणि दिल्लीमध्ये अगदी ‘हुज हू’, ज्याला आजकाल ल्युटियन्स असं म्हटलं जातं, असा एलिट वर्गही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होता. एरवी हा वर्ग इतरांशी फटकून वागत असला तरी (कदाचित गोऱ्या कातडीमुळेही असेल) पीटर ब्रुक्सनी कुठलाही व्यायाम प्रकार म्हणजे नाटकातला एक्सरसाइज करायला बोलावलं तर धाव घेऊन मंचावर जायचा, त्याच्यासोबत काम करायला उत्सुक असायचा.
नंतरच्या चर्चेत एकाने प्रश्न विचारला की, तुम्ही महाभारत का केलं? आणि पीटर ब्रुक्स भूतकाळात गेले, म्हणाले, एका चित्रपटाचं शूटिंग संपवून आम्ही आलो. रात्री माझ्या एका मित्राने झोप येत नव्हती म्हणून मला महाभारताची गोष्ट सांगायला सुरुवात केली. पहाटे सव्वासहा वाजता ती गोष्ट संपली… आणि ज्या क्षणी गोष्ट संपली त्या क्षणी मी असं ठरवलं की, आता महाभारत! फक्त महाभारत!!
मग ते सांगू लागले की, त्यांनी आठ वर्षे महाभारताचा अभ्यास कसा केला, कशी विविध प्रकारची महाभारताची पुस्तकं आणून वाचली, लोकांशी चर्चा केली वगैरे वगैरे. तो सगळा आठ वर्षांचा केवळ अभ्यासाचा. नाटक लिहिणे, बसवणे वगैरे फार नंतरची गोष्ट होती. तो काळ वेगळाच, पण आठ वर्षे कसं त्यांनी स्वतःला महाभारताला समर्पित केलं त्याची गोष्ट ते सांगू लागले. ही गोष्ट ऐकता ऐकता आम्ही प्रभावित झालो होतो. ते कष्ट, ती तळमळ, एखाद्या गोष्टीला वाहून घ्यायचं म्हणजे काय, समर्पण वगैरे वगैरे सगळं आम्हाला दिसत होतं आणि…
अचानक त्या हॉलच्या एका दारातून आवाज आला…सूप बट रहा है… आणि अक्षरश तो सगळा एलिट क्लास उठून उभा राहिला आणि भोजन कक्षाकडे धावला. आम्ही विद्यार्थी आपले बसून होतो. पीटर ब्रुक्सनी एकाला विचारलं, “काय झालं?” त्यांना वाटलं, बाहेर काय बॉम्ब फुटला की काय? की आपत्कालीन परिस्थिती आली? ते बिचारे चिंतीत झाले होते. कोणीतरी सांगितलं, “नाही, कालच्या जेवणामध्ये अनेकांना सूप मिळालं नव्हतं, मोठी रांग लावावी लागली होती त्या वेळी. आता सूप आलंय तर लोक पटापटा जाऊन सूप घेत आहेत.”
तो स्तब्ध झाला. आम्हीही. एक माणूस महाभारत करायचं म्हणून सगळं सोडून देऊन आठ वर्षे महाभारत समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही आजच्या जेवणामध्ये गर्दी असल्यामुळे सूप मिळणार नाही म्हणून त्याचं ते सगळं बोलणं सोडून सूप घ्यायला धावलो होतो. सूप म्हटलं की, मला हेच आठवतं. कालच ही हकीकत एका मित्राला सांगत होतो. तो खळखळून हसला आणि म्हणाला, “अरे, त्या कार्यशाळेचे तुम्ही तीनतेरा वाजवले की!” आता ‘तीनतेरा वाजवणे’ म्हणजे बट्ट्याबोळ करणे हे मला माहिती आहे, पण नेमकं तीनतेराच का? दोनचौदा का नाही? किंवा सहासोळा का नाही? असा प्रश्न माझ्या मनाला पडलाय.
हो, कारण आपल्याही काळाचे तपशील बदललेत ना? तुमच्यापैकी कोणाला कल्पना आहे का, तीनतेरा असंच का म्हटलं जातं? आज सूप पीत पीत विचार करा न् कळवा.

























































