सिक्सर किंग युवराजचा चेला सप्टेंबर महिन्याचा सर्वोत्तम खेळाडू, ICC ने केली घोषणा

पहिल्या चेंडूपासूनच गोलंदाजांवर तुटून पडणारा हिंदुस्थानचा युवा विस्फोटक फलंदाज अभिषेक शर्माची सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोरदार चर्चा आहे. माजी खेळाडू युवराज सिंगला त्याने आपला आदर्श मानलं आहे. आशिय चषकामध्ये त्याची आक्रमक आणि नेत्रदिपक चौफेर फटकेबाजी साऱ्या जगाने पाहिली. अंतिम सामना सोडला तर उर्वरित सामन्यांमध्ये त्याने गोलंदाजांची धुलाई केली. त्याच्या याच धुवाँधार फटकेबाजीमुळे ICC ने त्याची सप्टेंबर महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू (ICC Men’s Player of the Month)  म्हणून निवड केली आहे.

ICC ने अभिषेक शर्माची सप्टेंबर महिन्यासाठी सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड केली आहे. आशिया चषकामध्ये त्याने 200 च्या स्ट्राईक रेट आणि 44.85 च्या सरासरीने स्पर्धेतील सर्वाधिक 314 धावा चोपून काढल्या. सुपर चारच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध त्याने ताबडतोब फलंदाजी करत 39 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 74 धावांची वादळी खेळी केली. त्यानंतर बांगलादेशविरुद्ध 75 आणि श्रीलंकेविरुद्ध 61 धावांची त्याने खेळी केली. त्यामुळे आशिया चषकामध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मान सुद्धा त्याने पटकावला. त्याने संपूर्ण स्पर्धेत एकून 32 चौकार आणि 19 षटकारांची आतषबाजी केली. त्यामुळे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही त्याला गौरवण्यात आलं. तसेच सध्याच्या घडीला तो ICC टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.

सप्टेंबर महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावल्यानंतर अभिषेक शर्माने आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की, “हा पुरस्कार मिळाल्यामुळे मी खूप खूश आहे. कठीण परिस्थितीतही सामना जिंकू शकणाऱ्या संघाचा मी भाग आहे, याचा मला अभिमान वाटतो.” असं अभिषेक शर्मा म्हणाला.