
अमेरिकेतील प्रसिद्ध फिनटेक कंपनी बोल्टने मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करत थेट संपूर्ण एचआर विभागच बंद केल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रायन ब्रेस्लो यांनी हा निर्णय कंपनीच्या पुनर्रचनेचा भाग असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, एचआर विभागामुळे कंपनीत अनावश्यक अडचणी निर्माण होत होत्या.
अलीकडच्या काळात अनेक मोठ्या टेक कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी आणि व्यवसाय अधिक कार्यक्षम करण्यासाठी कर्मचारी कपात केली आहे. मात्र, एखाद्या कंपनीने थेट संपूर्ण एचआर विभागच काढून टाकल्याची घटना अत्यंत दुर्मिळ मानली जाते.
फॉर्च्युन वर्कफोर्स इनोव्हेशन समिटमध्ये बोलताना रायन ब्रेस्लो म्हणाले की, कंपनीला पुन्हा उभारी देण्यासाठी कठोर निर्णय घेणे आवश्यक होते. “आमच्याकडे HR टीम होती आणि ती प्रत्यक्षात नसलेल्या समस्या निर्माण करत होती. जेव्हा आम्ही तो विभाग बंद केला, तेव्हा त्या समस्या आपोआप संपल्या,” असे त्यांनी सांगितले. बोल्टची स्थापना 2014 मध्ये झाली होती. काही वर्षांतच ही कंपनी अमेरिकेतील वेगाने वाढणाऱ्या फिनटेक स्टार्टअप्सपैकी एक बनली. मात्र, नंतर कंपनीच्या मूल्यांकनात मोठी घसरण झाली आणि आर्थिक अडचणी वाढल्या. त्यामुळे कंपनीला अनेक टप्प्यांत कर्मचारी कपात करावी लागली. असे वृत्त आज तक ने दिले आहे.
रायन ब्रेस्लो यांनी काही काळ सीईओ पद सोडले होते. त्यांच्या अनुपस्थितीत कंपनीची स्थिती आणखी खालावली. त्यानंतर ते पुन्हा कंपनीत परतले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना सुरू केली. ब्रेस्लो यांनी स्पष्ट केले की कंपनी पूर्णपणे एचआर विना काम करत नाही. सध्या कंपनीकडे एक छोटी एचआर ऑपरेशन्स टीम आहे, जी कर्मचारी सहाय्य, प्रशिक्षण आणि आवश्यक प्रशासकीय कामकाज पाहते. मात्र, पूर्वीप्रमाणे मोठा एचआर विभाग ठेवण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.
कंपनीने पुनर्रचनेदरम्यान चार दिवसांचा कामाचा आठवडा, अमर्याद सुट्ट्या यांसारख्या सुविधा देखील बंद केल्या आहेत. आता कंपनीचे लक्ष कामगिरी, वेग आणि परिणामांवर केंद्रित असल्याचे ब्रेस्लो यांनी स्पष्ट केले. सध्या कंपनीत सुमारे 100 कर्मचारी कार्यरत आहेत. ही संख्या पूर्वीपेक्षा खूपच कमी असली, तरी कंपनी आता अधिक वेगाने काम करत असून ग्राहकांना जलद सेवा देण्यात यशस्वी होत असल्याचा दावा व्यवस्थापनाने केला आहे.



























































