
अबुधाबीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ड्रोन हल्ल्याचा अरब सैन्याने काही तासांतच जबरदस्त बदला घेत हुथी बंडखोरांच्या टॉप कमांडरचा खात्मा केला. अरब सैन्याच्या लढाऊ विमानांनी सोमवारी मध्यरात्री थेट येमेनची राजधानी असलेल्या सानाच्या उत्तरेकडील भागात घुसून भीषण हवाई हल्ले केले. या हल्ल्यांत हुथीचा टॉप कमांडर मेजर जनरल अब्दुल्लाह कासिम अल जुनैदचा खेळ खल्लास झाला.
अरब वृत्तवाहिनी ‘अल हदाथ’ने हुथीचा टॉप कमांडर हवाई हल्ल्यात ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दहशतवादी संघटना हुथीने सोमवारी अबूधाबी विमानतळावर ड्रोनच्या साहाय्याने भयंकर स्फोट घडवले होते. त्यात दोन हिंदुस्थानींसह तिघांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा संयुक्त अरब अमिरातीसह हिंदुस्थान व इतर देशांकडून तीव्र निषेध केला जात आहे. याचदरम्यान संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियाच्या अरब सैन्याने काही तासांतच मध्यरात्री थेट येमेनच्या राजधानीत घुसून भीषण हवाई हल्ल्यांचा धडाका सुरु ठेवला.
- अबुधाबी विमानतळावरील हवाई हल्ल्यात प्राण गमावलेल्या दोन हिंदुस्थानी नागरिकांची ओळख पटवण्यात आली आहे. त्यांचे मृतदेह मायदेशी हिंदुस्थानला पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती यूएईतील हिंदुस्थानी दूतावासाकडून मंगळवारी देण्यात आली.
सलग 24 तास हवाई हल्ले सुरू ठेवणार
अरब सैन्याने सलग 24 तास हवाई हल्ले सुरू ठेवून हुथी बंडखोरांचा बीमोड करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे हुथी बंडखोरांचे धाबे दणाणले आहेत. येमेनमध्ये मागील सहा वर्षांपासून गृहयुद्धाचा भडका उडालेला आहे. यूएईने काही आठवडय़ांत हुथी बंडखोरांविरुद्ध लष्करी कारवाईला गती दिली आहे.




























































