प्रवाशांची फास्ट एसी लोकलना जादा पसंती, पिकअवरच्या जलद फेर्‍यांना प्रचंड गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सतत घड्याळाच्या काट्यावर धावणार्‍या मुंबईकरांना एका – एका मिनिटांचाही वेळ मोलाचा असल्याचे आता एसी लोकलच्या बाबतीही दिसत आहे. काही दिवसांपूर्वी एसी लोकलच्या महागड्या तिकीटावरून नाके मुरडली जात होती. परंतू वाढत्या उन्हाच्या तडाक्यामुळे एसी लोकलची गर्दी वाढत असून त्यातल्या त्यात पिकअवरच्या फास्ट एसी लोकलना जादा मागणी असल्याचे चित्र आहे.

मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या सध्या 60 फेर्‍या होत आहेत. तर पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या 20 फेर्‍या होत आहेत. या फेर्‍या एकूण फेर्‍यांच्या तुलनेत खूपच कमी असल्याने प्रवाशांना एसी लोकलचा पास काढताना जड जात असते. कारण एवढा महागडा पास काढायचा आणि फेरी चुकली तर साध्या लोकलने प्रवास कशाला करायचा अशी सर्वसाधारण धारणा होत असते. परंतू एसी लोकलचे तिकीट फर्स्ट क्लासच्या तिकीटापेक्षा 1.3 महाग असल्याने त्यापेक्षा पास काढून प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यामुळे एसी लोकलच्या पिकअवरच्या फेर्‍यांना गर्दी वाढतच चालली आहे. त्यातच भायखळा येथे न थांबणार्‍या किंवा कमी थांबे असणार्‍या डबल फास्ट एसी लोकलना सध्या प्रचंड मागणी वाढली आहे. सीएसएमटी स्थानकातून सायं. 6.10 वाजता सुटणार्‍या ठाणे फास्ट लोकलमध्ये प्रवासी रांगा लावून चढत असल्याचे चित्र आहे. तर सकाळच्या पिकअवरच्या फास्ट एसी लोकलनाही जादा पसंती दिली जात आहे.

रात्रीचा दारूडे आणि फुकट्यांचा प्रवास

मध्य रेल्वेच्या एसी लोकलमध्ये रात्रीच्यावेळी दारूडे, तसेच फुकटे प्रवासी बिनधास्त प्रवास करीत असल्याचे फोटो समाजमाध्यमांवर फिरत आहेत. सध्या एसी लोकलचे तिकीट कधी स्वस्त होणार, तिची वाढलेली गर्दी आणि फुकटे प्रवासी यावरच अधिक चर्चा सुरू आहे. ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या उभारणीनंतर मध्य रेल्वेने नव्या 36 फेर्‍यांमध्ये एसी लोकलच्या 34 फेर्‍या टाकल्याने मध्य रेल्वेच्या एकूण फेर्‍यांची संख्या 60 इतकी झाली आहे.

सोमवार 4 एप्रिल 2022 ची आकडेवारी

रेल्वे – तिकीट – प्रवासी – कमाई
पश्चिम- 2649, – 53,413, – 20,76,031
मध्य – 2483, – 51,944 – 20,50,225