एसी लोकलच्या तिकीटांचे दर झाले निम्मे तर गर्दी फूल्ल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसी लोकल आणि नॉन एसी फर्स्टक्लासचे दर घटविल्याच्या पहिल्या दिवशी काल मुंबईकरांचा हाऊस फूल्ल प्रतिसाद मिळाला. मध्य रेल्वेच्या एसीची 4,776 तिकीटे विकली गेली तर पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलची 4,350 तिकीट विक्री झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्रवासी तिकीटाचे दर कमी झाल्याच्या पहिल्याच दिवशी गुरूवार 5 मे रोजी मुंबईकरांनी एकदम तुंडूंब प्रतिसाद दिला आहे. एसी लोकलचे तिकीट दर आधी फर्स्टक्लासच्या तिकीट दराच्या 1.3 पट जादा असल्याने प्रवासी नाराज होते. रेल्वे राज्यमंत्र्यांनी गेल्या गेल्या शुक्रवारी झालेल्या जाहीर कार्यक्रमात एसी लोकलच्या सिंगल जर्नी तिकfटाचे दर निम्म्याने कमी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर रात्री साध्या लोकलचे फर्स्टक्लासचे तिकीटांचे दर कमी केल्याचे परिपत्रक जारी करण्यात आले.

रविवार व सुट्टीची एसी लोकल चालवा…

एसीचे पास दर अजूनही महागडे असून प्रवासी तिकीटांचे दर निम्मे कमी केल्याने पर्यटन म्हणून किंवा कधीतरी प्रवास करणार्‍यांना फायदा होणार असून ओला किंवा उबरने ट्रॅफिकमध्ये अडकण्यापेक्षा प्रदुषणमुक्त वातानुकूलित लोकलचा प्रवास तुलनेने स्वस्त झाला आहे. रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांना एसी लोकल मेन्टेनन्ससाठी बंद ठेवली जात असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त करीत आठवड्याचे सर्व दिवस एसी लोकल चालविण्याची मागणी होत आहे.

असे वाढले प्रवासी व कमाई

एसीचे दर कमी होण्यापूर्वी मध्य रेल्वेच्या एसी लोकलच्या प्रवासी तिकीटांची विक्री 4 एप्रिल रोजी 2,803 इतकी होऊन 3,102 प्रवाशांनी प्रवास केला होता. तर तिकीट दर घटल्याच्या पहिल्याच दिवशी काल 5 एप्रिल रोजी मध्य रेल्वेच्या एसी लोकलचे 4,776 प्रवासी तिकीट विकले जाऊन 5,336 प्रवाशांनी प्रवास केला तर त्यातून 4,66,405 रूपयांची कमाई झाली आहे. तर पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलची 4,350 प्रवासी तिकीट विकली जात 5 हजार प्रवाशांनी प्रवास केला तर सुमारे चार लाखांची कमाई झाली आहे.

मध्य व पश्चिम रेल्वेचे तिकीट विक्रीचे आकडे

वर्गवारी मध्य – पश्चिम
एसी 4,776 – 4,350
कमाई 4,66,405 – 4,30,000