मध्य रेल्वेच्या एसी लोकलसाठी प्रवासी शोधमोहीम!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ac-local-train

मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लोकलचा पनवेल ते ठाणे ट्रान्सहार्बर मार्गावर शुभारंभ होणार असला तरी वेळापत्रकात ही लोकल 31 जानेवारीपासूनच समाविष्ट होणार आहे. या एसी लोकलला प्रवासी लाभतील की नाहीत याबाबत मध्य रेल्वे साशंक असल्याने आता आरामदायी एसी सफरीला प्रवासी शोधण्यासाठी मध्य रेल्वे नवी मुंबई परिसरातील कॉर्पोरेट कार्यालयांना भेट देणार आहे.

ठाणे ते वाशी-पनवेल या ट्रान्सहार्बर मार्गावरील फेऱयांमधील एक साधी लोकल काढून तिच्याऐवजी वातानुकूलित लोकलचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे ट्रान्सहार्बर मार्गावर दिवसभरात एसी लोकलच्या 16 फेऱया होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या एसी लोकलला नेमका कसा प्रतिसाद मिळणार याविषयी मध्य रेल्वेच्या अधिकाऱयांना चिंता वाटत आहे. प्रवाशांच्या साध्या लोकलच्या तितक्याच फेऱया कमी होणार असल्याने एसी लोकलचे महागडे तिकीट विकत घेऊन कोण प्रवास करणार असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे ठाणे ते वाशी-पनवेल या ट्रान्सहार्बर मार्गावरील कॉर्पोरेट कार्यालयांना ई-मेल पाठवून तसेच प्रत्यक्ष भेटी देण्यात येणार आहेत. या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱयांना कार किंवा ओला-उबेरमधून प्रवास करून प्रदूषणात भर टाकण्यापेक्षा मध्य रेल्वेच्या एसी लोकलमधून प्रवास करावा अशी विनंती करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे. एसी लोकलचा ठाणे ते वाशी मासिक पास 1400 रुपयांचा असणार आहे, तर ठाणे ते पनवेल मासिक पासासाठी 1730 रुपये मोजावे लागणार आहेत.