
सामना प्रतिनिधी । अलिबाग
रोहा तालुक्यातील एनघर ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या बांधकामाबाबत नवीन ना हरकत दाखला देण्यासाठी 25 हजाराची मागितलेल्या लाचेप्रकरणी ग्रामसेवक आनंतराज मेश्राम (51) याला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. अलिबागच्या लाचलुचपत विभागाने मेश्राम यांना पनवेल येथील हॉटेल सरोवर येथे पैसे घेताना रंगेहाथ पकडले.
तक्रारदार यांचे रोहा तालुक्यातील ऐनघर ग्रामपंचायती हद्दीत बांधकाम सुरू आहे. या बांधकामाबाबत ग्रामपंचायतीकडे ना हरकत दाखला मिळण्यासाठी तक्रारदार यांनी ग्रामसेवक मेश्राम यांच्याकडे अर्ज केला होता. त्यानुसार ग्रामसेवक यांनी त्यांना ना हरकत दाखला ग्रामपंचायतीचा दिला होता. मात्र हा ना हरकत दाखला नियमानुसार दिला नव्हता. याबाबत तक्रारदार यांनी ग्रामसेवक मेश्राम यांना नियमानुसार दाखला देण्याबाबत सांगितले. नियमानुसार दाखला देण्यासाठी आनंतराज मेश्राम यांनी तक्रारदार यांच्याकडे 25 हजाराची लाचेची मागणी केली.
आरोपी मेश्राम यांनी मागितलेली लाच फिर्यादी यांना द्यायची नव्हती. तरीही तडजोडीअंती 25 हजार रुपये पनवेल येथे हॉटेल सरोवरमध्ये देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी अलिबाग येथे लाचलुचपत विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर लाचलुचपत विभागाने पडताळणी करून सापळा रचला. आरोपी आनंतराज मेश्राम हे पनवेल येथील हॉटेल सरोवर येथे लाचेची रक्कम घेण्यास आले असता लाचलुचपत विभागाने त्यांना 25 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
सदरची कारवाई पोलीस उप अधीक्षक विवेक जोशी, पोलीस निरक्षक बकाले, पोलीस हवालदार पाटील, गंभीर, मोरे, पोलीस नाईक तारी, शिर्के, पोलीस शिपाई मगर यांनी पार पाडली.
































































