नौकांच्या शाकारणीच्या कामाला गती

प्रातिनिधिक फोटो

शासनाने 1 जूनपासून 31 जुलैपर्यंतच्या कालावधीसाठी मत्स्य संपतीचे संवर्धन आणि प्रभावी व्यवस्थापन तसेच सुरक्षेच्या कारणास्तव महाराष्ट्राच्या प्रादेशिक जल क्षेत्रात मोटारीकृत आणि यांत्रिकी मासेमारी बोटींना मासेमारी करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे हर्णे बंदरात मासेमारी करणाऱया मासेमारांनी आप आपल्या मासेमारी बोटी आंजर्ले, अडखळ खाडीत आणून बोटींच्या शाकारणीचे काम सुरू केले आहे. त्यामुळे एरव्ही मासेमारी बोटींनी गजबजलेले हर्णे बंदर पूर्णपणे शांत पडले आहे.

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अन्वये या वर्षी 1 जून 2024 ते 31 जुलै 2024 या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधी क्षेत्रात यांत्रिक नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. 1 जून ते 31 जुलै या दरम्यानच्या कालावधीत मासळीच्या जिवाना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. तसेच या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठय़ाचे जतन होते. त्याचप्रमाणे या कालावधीत खराब वादळी हवामानामुळे होणारी मच्छीमारांची जीवित व वित्तहानी मासेमारी बंदीमुळे टाळता येणे शक्य होते. त्यामुळे हर्णे बंदरात मासेमारी करणाऱया बहुतांश नौकांनी आंजर्ले अडखळ खाडीत ज्या ठिकाणी सुरक्षित जागा मिळेल त्या ठिकाणी आपल्या मासेमारी बोटी आणून ठेवल्या आहेत.