मोटारसायकल-कंटेनर अपघातात वर्गमित्रांचा मृत्यू; गंगापूर तालुक्यातील भेंडाळा फाटा येथील घटना

गंगापुरहून संभाजीनगरकडे जात असताना भेंडाळा फाट्याजवळ बुधवारी सकाळी 6 वाजता संभाजीनगर येथे कॉलेजला जात असताना दोन महाविद्यालयीन वर्गमित्रांचा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला धडकून मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालय येथील रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. या अपघातात आदित्य रामनाथ सुंब (18, रा. मांजरी, ता. गंगापूर) आणि यश नयन शेंगुळे (18, रा. जयसिंगनगर, गंगापूर) हे दोघे मोटारसायकलने संभाजीनगरला सीईटी क्लाससाठी सकाळी 6 वाजता मोटारसायकलने जात होते.

त्यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेला कंटेनरला ते धडकले. या अपघातात सळई गळ्यामध्ये घुसल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस राहुल वडमारे घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ यांनी दोघांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सकाळी 11 वाजता शोकाकुल वातावरणात गंगापूर येथील कायगाव रोडवरील स्मशानभूमीत यश नयन शेंगुळे व आदित्य रामनाथ सूंब या दोन्ही वर्गमित्रांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संभाजीनगरला घेतला होता फ्लॅट
या दोघांसाठी त्यांच्या पालकांनी दोन दिवसांपूर्वीच महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी संभाजीनगर येथे फ्लॅट घेतला होता. परंतु त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर असा घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही वर्गमित्रांचा मृत्यू झाल्याने गंगापूर शहरात व मांजरी गावात शोककळा पसरली. आदित्यच्या पश्चात आई, वडील, बहीण, काका, काकी, आजी असा परिवार आहे.