वाळवणेच्या यात्रेवरून परतताना चास-कामरगाव घाटात अपघात; दोघांचा मृत्यू,एकजण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पारनेर तालुक्यातील वाळवणे येथील भैरवनाथ यात्रेहून नगरकडे परतत असताना नगर-पुणे महामार्गावर चास-कामरगाव घाटात झालेल्या भीषण अपघातात नगर शहरातील दोघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघातात नगरमधील मुर्तीकार बबन उर्फ लक्ष्मण दत्तात्रय गोसके (वय 62, रा.बागरोजा हडको) व महापालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश रंगनाथ गोरे (वय 72, रा.बागरोजा हडको) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर महापालिकेतील वाहनचालक प्रशांत प्रकाश पवार हे जखमी झाले असून त्यांच्यावर नगर मधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोरोना संकटानंतर तीन वर्षांनी वाळवणे येथील भैरवनाथांची यात्रा रविवारी भरली होती. या यात्रेत नगरमधील तिघेजण जेवणासाठी वाळवणे येथे गेले होते. रात्री 9.30 ते 10 वाजण्याच्या सुमारास ते नगर-पुणे महामार्गावरुन मारुती ऑल्टो कारने सुप्याकडून नगरकडे परतत असताना कामरगाव शिवारात असलेल्या हॉटेल सुवर्णज्योतच्या पुढील बाजूस चास-कामरगाव घाटात पुढे चाललेल्या आयशर टेम्पोला त्यांची कारची पाठीमागून जोराची धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचुर झाला.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावून पोलिसांना माहिती दिली. अपघातात जखमी झालेल्या तिघांनाही रुग्णवाहिकेतून नगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील प्रकाश रंगनाथ गोरे यांचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला तर बबन गोसके यांच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी (दि.18) सकाळी 7 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. वाहन चालक प्रशांत पवार यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

अपघातात मृत्यू झालेले बबन गोसके हे नगरमधील प्रसिद्ध मुर्तीकार होते. त्यांचा नेप्ती नाका परिसरात गोसके आर्टस्‌ म्हणून मुर्त्यांचा कारखाना आहे. लहानपणापासून बागडपट्टी परिसरात राहणारे लक्ष्मण गोसके हे गेल्या 8-10 वर्षांपासून बागरोजा हडको परिसरात वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी असा परिवार आहे. तसेच प्रकाश रंगनाथ गोरे हे महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी असून त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी असा परिवार आहे. एकाच अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने बागरोजा हडको परिसरासह शहरात हळहळ व्यक्त होत आहे.