
सामना प्रतिनिधी । मालवण
नवरी मुलगी विवाहासाठी निघालेल्या गाडीला अपघात होऊन नवरी मुलींसह तिचे नातेवाईक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी कसाल-कट्टा मार्गावर घडली. मात्र फॅक्चर झालेल्या हातावर प्लॅस्टर करून नवरी सभागृहात दाखल झाली आणि विवाह सोहळा निर्विघ्न पार पडला. दरम्यान नवरी मुलीने दाखवलेल्या या धैर्याचे कौतुक सर्वत्र केले जात आहे.
कसाल मार्गालगत असलेल्या एका गावातील मुलीचा विवाह मालवण तालुक्यातील एका मुलाशी शनिवारी दुपारी १२ : ३० च्या मुहूर्तावर कट्टा येथील एका सभागृहात निश्चित करण्यात आला होता. मात्र विवाह स्थळी येण्यास येण्यास निघालेल्या नवरी मुलगी असलेल्या गाडीची धडक ब्लड बँकेच्या गाडीला पडवे येथे बसली. गाडीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. नवरी मुलीसह तिचे आई-वडील, बहीण व चालक असलेला भाऊ जखमी झाले.
नवरी मुलीला लागलीच लगतच्या लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात तर चालकाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. नवरी मुलगी व तिच्या नातेवाईकांवर उपचार करेपर्यंत साडेबाराचा मुहूर्त चुकला. मात्र मुलाच्या नातेवाईकांनी दुपारी ३ चा मुहूर्त काढला. त्यानंतर फॅक्चर झालेल्या हातावर प्लॅस्टर करून नवरी सभागृहात दाखल झाली.अखेर सर्वांच्या साक्षीने विवाह सोहळा निर्विघ्न पार पडला. नवरी मुलीने दाखवलेल्या धैर्याची चर्चा मात्र सर्वत्र सुरू होती.

































































