भरधाव कारच्या धडकेने रिक्षा उलटली; प्रवासी व चालक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवण-कसाल राज्यमार्गावर आनंदव्हाळ-कर्लाचाव्हाळ येथे भरधाव वेगाने येणाऱ्या कारची रिक्षाला जोरदार धडक बसल्याने रिक्षा रस्त्यावरच उलटली. या अपघातात चालकासह तीन प्रवासी रिक्षाखाली सापडून जखमी झाले. शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. जखमी रिक्षा चालकाने प्रसंगावधान राखत रिक्षाखाली अडकलेल्या लहान मुलासह त्याच्या वडिलांना बाहेर काढले. त्यांनंतर जखमींवर चौके प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर मालवण येथील रेडकर हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.

मालवण शहरातील देऊळवाडा येथील रिक्षा व्यावसायिक महेश प्रकाश गावकर हे मालवणात आलेल्या नवी मुंबई येथील प्रवाशांना घेऊन कणकवली येथे जाण्यासाठी निघाले होते. आनंदव्हाळ-कर्लाचाव्हाळ मार्गावर मालवणच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या कुडाळ येथील कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की रिक्षा रसत्वारच उलटली. रिक्षातील रवींद्र बाजीराव झोरे (वय 32, रा. नवी मुंबई) तीन वर्षीय मुलगा वियान यासह रिक्षाचालक महेश गावकर रिक्षाखाली अडकले. तर हर्षदा रवींद्र झोरे (वय 30) या रिक्षातून बाहेर फेकल्या गेल्या.

रिक्षाचालक महेश गावकर यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. मात्र रिक्षाखालून सुटका करत गावकर यांनी जखमी अवस्थेत रिक्षा उचलून धरत रिक्षाखाली अडकलेल्या रवींद्र व वियन या पितापुत्राला बाहेर काढले. रवींद्र यांच्या डोक्याला दुखापत झाली तर पायाला गंभीर दुखापत झाली. तर वियन याच्या हाताला व पायाला दुखापत झाली. तसेच रिक्षा बाहेर फेकल्या गेलेल्या हर्षदा याही जखमी झाल्या.

कार व रिक्षा यांच्यातील अपघातानंतर सर्व जखमी मदतीच्या प्रतीक्षेत असताना साळेल येथून मालवणला जात असणारे पत्रकार सिद्धेश आचरेकर यांनी अपघातातील सर्व जखमीना नगरसेवक यतीन खोत यांच्या कारमधून चौके प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ यांनी जखमींवर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर जखमींना मालवण येथील खासगी रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले असून
त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जखमींचे जबाब नोंदवले.