
सामना प्रतिनिधी । नांदेड
भरधाव रुग्णवाहिकेने दिलेल्या बाईकला दिलेल्या धडकेत पती-पत्नी ठार झाल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. बुधवारी सकाळी मुसलमानवाडी पाटीजवळ हा अपघात झाला. या अपघातात बाईकवरील मुलगीही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्णा रोड येथील बालाजी सुभाषराव कुलकर्णी हे त्यांची पत्नी मनिषा कुलकर्णी यांच्यासोबत गंगाखेड येथील मावशीकडे धोंडे जेवणासाठी गेले होते. बुधवारी धोंडे जेवण करुन ते नांदेडकडे येत असताना मुसलमानवाडी पाटीजवळ कर्नाटक येथील भरधाव वेगात येणाऱ्या रुग्णवाहिकेने त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील बालाजी कुलकर्णी (३२), त्यांची पत्नी मनिषा कुलकर्णी व त्यांच्या नातेवाईकांची मुलगी सृष्टी जोशी (१२) हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी बालाजी कुलकर्णी व मनिषा कुलकर्णी यांना मृत घोषित केले, तर सृष्टी जोशी ही देखील गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.
घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन.एस.आम्ले व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेचा चालक नीरल तनगोडला ताब्यात घेण्यात आले असून, चंदाबाई कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.































































