सोलापुरात भरधाव ट्रकने दोघांना चिरडले, दोनजण गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ट्रकने दिलेल्या धडकेत भाजीविक्रेती महिला व दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना अक्कलकोट रोडवरील मल्लिकार्जुननगर येथे घडली आहे. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे. यात दोनजण गंभीर जखमी आहेत. जुलेखा मुर्तूज शेख (रा. पडगीनगर), मोहसीन हमीद पठाण अशी मृतांची नावे आहेत, तर खंडेराव बाळकृष्ण बाळशंकर व तौसीफ हमीद शेख हे जखमी झाले आहेत.

अक्कलकोट रोड मल्लिकार्जुननगर येथे रस्ता चौपदरीकरणाचे काम चालू असून, या ठिकाणी रस्त्याच्या कडेला भाजीविक्रेते बसलेले असतात.

सिमेंटचे पोते घेऊन निघालेला एक ट्रक मल्लिकार्जुननगर येथे आला असता चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला बसलेली भाजीविक्रेती महिला जुलेखा शेख व दुचाकीवरून निघालेले मोहसीन पठाण या दोघांबरोबरच तौसीफ हमीद शेख, खंडेराव बाळकृष्ण बाळशंकर यांना ट्रकने धडक दिली.

यात चौघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता जुलेखा शेख व मोहसीन पठाण या दोघांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला, तर खंडेराव बाळशंकर व तौसीफ शेख यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद एमआयडीसी पोलिसांत करण्यात आली आहे.