जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, पाच वाहने एकमेकांवर आदळून सहा जखमी

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील बारबाई गावाजवळ आज दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले आणि पाच वाहनांना जोरदार धडक दिली. ही धडक एवढी मोठी होती की, रिक्षासह तीन कार एकमेकांवर आदळून अक्षरश: फेकल्या गेल्या. या दुर्घटनेत सहाजण जखमी झाले असून त्यांना नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

जुन्या मुंबई-पुणे मार्गावरील बारबाई गावाजवळ वेगात जात असलेल्या ट्रकने पाच गाडय़ांना धडक दिली. त्यामुळे काही काळ वाहतूककोंडी झाली होती. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रकचालकाचे नियंत्रण कसे सुटले याचा शोध स्थानिक पोलीस घेत आहेत. अपघाताचे वृत्त समजताच पोलिसांनी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने वाहनांमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढले व त्यांना रुग्णालयात दाखल केले.