राजस्थानमधून फुगे विकण्यासाठी आलेल्या दाम्पत्याच्या चिमुकल्याचं अपहरण करून व्यापाऱ्याला विकण्याचा प्रयत्न उधळला, आरोपीला अटक

राजस्थानहून सांगलीत फुगे विकण्यासाठी आलेल्या गरीब दाम्पत्याच्या वर्षभराच्या तान्हुल्याचे अपहरण करून चिपळूण सावर्डेमधील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकास विकण्याचा डाव सांगली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने (एलसीबी) उधळून लावला. या प्रकरणात तिघांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून, इनायत अब्दुलसत्तार गोलंदाज (वय ४३, रा. किल्ला भाग, मिरज) यास अटक करण्यात आली आहे. त्याचे साथीदार इम्तीयाज पठाण व त्याची पत्नी वसिमा इम्तीयाज पठाण हे दोघे फरार असून, त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या अपहरणाच्या घटनेने सांगलीत खळबळ उडाली होती. फुगे विक्रेते विक्रम पशपचंद बागरी (रा. विश्रामबाग, सांगली) हे रस्त्याच्या कडेला पत्नी व मुलासह झोपलेले असताना अज्ञातांनी त्यांच्या वर्षभराच्या बाळाचे अपहरण केले. या घटनेनंतर सांगली पोलीस कामाला लागले होते. तीन दिवस चाललेल्या तपास, चौकशी आणि छापेमारीनंतर अखेर पोलिसांनी चिमुरड्याला शोधून काढले आणि त्याला आईकडे सोपवले.

तपासादरम्यान उघडकीस आले की, वसिमा पठाणची बहीण वहिदा ही सावर्डे (चिपळूण) येथे राहते. वहिदाची ओळख स्थानिक ट्रान्सपोर्ट व्यवसायिक सचिन राजेशिर्के आणि त्यांच्या पत्नीशी होती. वहिदाने वसिमा आणि इम्तीयाज यांची ओळख राजेशिर्के यांच्याशी करून दिली होती. त्यांच्यात बाळासाठी अडीच लाख रुपयांचा व्यवहार ठरवला, ज्यापैकी दीड लाख रुपये वर्षभरापूर्वी दिले गेले होते. यानुसारच तिघांनी सांगलीतून गरीब दाम्पत्याचे बाळ पळवले होते.