
जामखेड शहराजवळील धोत्री शिवारात गणेश शिवाजी वारे या तरुणाचा खून करून फरार झालेल्या आरोपीला अटक करण्यात जामखेड पोलिसांना यश आले आहे. दीपक रणजित भवर (रा. सावरगाव, ता. जामखेड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. जामखेड तालुक्यातील धोत्री शिवारातील कापूस जिनिंग मिलच्या गेटवर 24 ऑक्टोबर रोजी बीड जिह्यातील गेवराई तालुक्यातील संगमजळगाव येथील गणेश वारे या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता.
याप्रकरणी मृताचे वडील शिवाजी मारुती वारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडे व जामखेड पोलिसांच्या दोन विशेष पथकांनी 15 दिवसांत आरोपीचा शोध घेतला. धोत्री शिवारातून भवर याला अटक करण्यात आली आहे.























































