
तेरा वर्षांच्या मुलीवर ऍसिड हल्ला करणारा नराधम 30 तासांनंतरही मोकाटच असल्याने नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. आरोपीच्या शोधासाठी दहा पथके कार्यरत असल्याचे पोलीस सांगत असले, तरी प्रत्यक्षात तपास ठप्पच असल्याचे चित्र स्पष्ट आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे सावट गडद झाले आहे. वडगाव पान आणि संगमनेर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. आज संतप्त जनतेने रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. विविध संघटना, विद्यार्थी आणि नागरिकांकडून मूक मोर्चे काढले जात आहेत. आरोपीला तत्काळ अटक करा, अन्यथा आंदोलन तीव्र करू, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
एकीकडे पीडित मुलीवर उपचार सुरू असताना, दुसरीकडे आरोपी मोकाट फिरत असल्याची भावना जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे. त्यातच पोलिसांनी धरलेले मौन संशय अधिकच गडद करणारे ठरत आहे. या भ्याड हल्ल्याचे पडसाद आता वडगाव पानपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. संपूर्ण संगमनेर शहर आणि तालुका संतापाच्या लाटेत सापडल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
आज सुवर्णकार समाज, सराफ संघटना आणि विविध व्यापारी संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. संगमनेर शहरात मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी ‘आरोपीला अटक करा, कठोर शिक्षा द्या’, या घोषणांनी शहर दणाणून गेले. दरम्यान, स्वर्णकार समाजाचे अध्यक्ष मोहन कुलथे, पोलीस मित्र संगमनेर तालुका उपाध्यक्ष स्वाती मुंडलिक, चैताली कुलथे, दीपाली गणोरेकर, वैशाली बुऱहाडे यांनी आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली. विविध संघटनांनी पोलीस निरीक्षक समीर बारवकर, उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे आणि नायब तहसीलदार मार्तंड माळवे यांना निवेदन देत संताप व्यक्त केला.





























































