घरी परतण्यास नकार दिल्याने संतापला, पतीचा पत्नीसह मुलावर अ‍ॅसिड हल्ला

पत्नीने घरी परत येण्यास नकार दिल्याने पती संतापला. संतापाच्या भरात पतीने पत्नीसह 12 वर्षाच्या मुलावर अ‍ॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना मुंबईतील वांद्रे परिसरात उघडकीस आली आहे. अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या मायलेकावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

‘मिड डे’ने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित महिला मूळची बीड जिल्ह्यातील असून तिचे आरोपीसोबत दुसरे लग्न आहे. पहिल्या लग्नापासून महिलेला एक 12 वर्षांचा मुलगा आहे. सहा वर्षांपूर्वी महिलेचे आरोपीसोबत दुसरे लग्न झाले होते. आरोपीला दारु आणि ड्रग्जचे व्यसन होते. यामुळे घरात वारंवार भांडणे होत होती. अखेर रोजच्या त्रासाला कंटाळून महिलेने मुलासह वेगळे राहण्याचा निर्णय घेतला.

महिला आपल्या मुलासह भाड्याने खोली घेऊन राहत होती. तसेच एका कॅटरींग कंपनीत काम करुन दोघांचा उदरनिर्वाह चालवत होती. महिला तिच्या घरी सोमवारी सायंकाळी बसली असताना आरोपी तिथे आला आणि तिला आपल्या सोबत येण्यास विनवू लागला. मात्र महिलेने त्याच्या सोबत जाण्यास नकार दिला.

पत्नी सोबत येण्यास तयार नसल्याने संतापलेल्या आरोपी पतीने पत्नीसह तिच्या मुलावर अ‍ॅसिड फेकले. यात दोघेही मायलेक जखमी झाले. यानंतर आरोपी पळून गेला. जखमी मायलेकाला तात्काळ भाभा रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात नेले. दोघांची प्रकृती स्थिर आहे.

याप्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच दिवशी आरोपीचा कसून शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस पुढील तपास करत आहेत.