
केवळ अक्कल दाढ नसणे हा बलात्कारपीडितेचे वय सिद्ध करण्यासाठी पुरावा नाही. अक्कल दाढेवरून वय सिद्ध होत नाही, असे महत्त्वपूर्ण मत उच्च न्यायालयाने बलात्कार प्रकरणात नोंदवले. या प्रकरणातील पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे सिद्ध करण्यास सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांनी आरोपीची निर्दोष सुटका केली. आरोपी महरबान हसन बाबू खानला याआधी विशेष न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. ती शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द केली.
मूळ उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेल्या महरबानने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. याप्रकरणी रायगडच्या विशेष पोक्सो न्यायालयाने 18 डिसेंबर 2019 रोजी महरबानला बलात्कार व पोक्सो कायद्याच्या विविध कलमांतर्गत दोषी ठरवले. त्या निर्णयाविरोधात महरबानने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्याच्या अपिलावर न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांनी नुकताच निकाल दिला. पीडितेची वैद्यकीय आणि रेडिओग्राफीक अशा दोन्ही प्रकारे तपासणी करणाऱ्या दंतचिकित्सकाच्या साक्षीच्या आधारे विशेष न्यायालयाने आरोपी महरबानला दोषी ठरवले होते. पीडित मुलीला अक्कल दाढ आली नव्हती. त्यावरून पीडित मुलगीचे वय 15 ते 17 वर्षांच्या आसपास असल्याचे मत दंतचिकित्सकाने व्यक्त केले होते. मात्र उलटतपासणीदरम्यान त्याने 18 वर्षे वयानंतर कधीही अक्कल दाढ येऊ शकते, असे मान्य केले होते. दंतचिकित्सकाच्या या जबाबावर बोट ठेवतानाच न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी वैद्यकीय न्यायशास्त्राचा संदर्भ दिला. या प्रकरणात पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षाने संबंधित साक्षीदार तपासले नाहीत. त्यामुळे मुलगी अल्पवयीन असल्याचे सिद्ध झाले नाही. तसेच महरबान आणि पीडित मुलीमधील शारीरिक संबंध हे सहमतीने झाले होते हे रेकॉर्डवरील पुराक्यांवरून स्पष्ट होते, असे नमूद करीत न्यायालयाने आरोपी महरबानची शिक्षा रद्द करीत त्याची निर्दोष सुटका केली. त्यामुळे सरकारी पक्षाला झटका बसला.
न्यायालय म्हणाले…
वैद्यकीय न्यायशास्त्रानुसार 17 ते 25 वर्षे वयोगटामध्ये अक्कल दाढ येते. अक्कल दाढ वगळता इतर सर्व दात मुलगा किंवा मुलगी वयात येईपर्यंत येतात. अक्कल दाढ आल्यास मुलगा किंवा मुलगी 17 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची असल्याचे लक्षात येते. मात्र अक्कल दाढ आली नाही म्हणून ती व्यक्ती (मुलगा का मुलगी) 18 वर्षांपेक्षा कमी वयाची असल्याचे सिद्ध होत नाही.
पीडित मुलगी 18 वर्षांपेक्षा कमी वयाची असल्याचे सिद्ध करणारे पुरावे नसतील तर पोक्सो कायद्यातील तरतुदी लागू केल्या जाऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत पीडित मुलगी आणि आरोपी हे दोघेही प्रौढ असल्याचे गृहीत धरता त्यांच्यात सहमतीने झालेले शारीरिक संबंध भादंवि कलम 375 अन्कये बलात्काराचा गुन्हा ठरत नाही.

























































