
गेल्या वर्षीच्या तुलनेत जिह्यात अपघात व अपघाती मृत्यूंमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. या आकडेवारीचे विश्लेषण करून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या तपासणी मोहिमेत कायद्याचे उल्लंघन करणाऱया 2 हजार 91 दोषी वाहनांवर केलेल्या कारवाईमध्ये 12 लाख 66 हजार 750 रुपयांचा दंड वसूल झाला आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱया वाहनधारकांना चाप बसणार आहे.
परिवहन आयुक्तांनी अपघात व त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली होती. यावेळी अपघात रोखण्यासाठी उपाययोजना राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे एक मार्च ते 15 मार्च 2023 दरम्यान राष्ट्रीय महामार्ग व इतर महामार्गांवर तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत विना हेल्मेट 754 वाहनधारक, वाहन चालवताना मोबाईलचा वापर 213, अती वेगाने चालणारी वाहने 490, सिटबेल्ट 215, चुकीच्या लेनमधून चालणारी वाहने 32, धोकादायक पार्किंग 169, ट्रिपल सीट 55, विमा नसलेली वाहने 138, पीयूसी नसलेली वाहने 63, योग्यता प्रमाणपत्र, नूतनीकरण नसलेली वाहने 65, रिफ्लेक्टर / टेल लॅम्प 20 अशा वाहनांवर कारवाई केली. याशिवाय जिह्यातील अपघातस्थळी तातडीने भेट देण्यासाठी व अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी दोन फिरत्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी पुन्हा अपघात होऊ नये, यासाठी उपाययोजना राबविण्याबाबत संबंधित विभागांना आदेश दिले आहेत.
ही मोहीम राबविण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक संदीप भोसले, योगेश ओतारी, मारुतीराव पाटील, सहायक मोटार वाहन निरीक्षक दाऊद मुश्रीफ, विनायक सूर्यवंशी, संग्राम देवणे, सुजित दंडेल, पूजा लोखंडे, प्रसाद सुरवसे, मोनिका साळुंखे, शिवदिनी लाड, राजेंद्र दराडे सहभागी झाले होते.




























































