
सामना ऑनलाईन । मुंबई
वाहनांना नियमबाह्य फिटनेस प्रमाणपत्र दिल्याचा ठपका ठेवत 37 आरटीओ अधिकाऱ्याना निलंबित केले असले तरी या यादीत सुमारे 60 अधिकाऱ्याची नावे होती. उर्वरित 23 अधिकाऱ्याची नावे यादीतून गायब कशी झाली, असा प्रश्न आता विचारला जात आहे. राज्याच्या परिवहन सचिवांना न्यायालयाची आलेली बेअदबीची नोटीस व या महिन्याच्या अखेरीस न्यायालयात होणारी सुनावणी या पार्श्वभूमीवर घाईघाईत केवळ निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यावर कारवाई केल्याचे बोलले जात आहे. डेप्युटी आरटीओ दर्जाच्या अधिकाऱ्यावर का कारवाई नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
पुण्यातील श्रीकांत कर्वे यांनी वाहनांना देण्यात येणारे फिटनेस प्रमाणपत्रच्या पद्धतीबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीच्या संदर्भातील ही निलंबनाची कारवाई झाली आहे. वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र देताना व्हिडीओ शूटिंग करण्याचे आदेश होते. त्या अनुषंगाने यवतमाळ, कोल्हापूर, पुणे, संभाजीनगर, पनवेल व ठाण्यातील आरटीओ कार्यालयात फिटनेस प्रमाणपत्र देताना सीसीटीव्हीच्या माध्यमातून शूटिंग करण्यात आले. वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र देताना जे अधिकारी उपस्थित नव्हते त्यांच्या नावांची यादी तयार करण्यात आली. यामध्ये सुमारे 60 आरटीओ अधिकाऱ्याचा समावेश होता, पण निलंबनाची कारवाई फक्त 37 अधिकाऱ्यावर झाली आहे. उर्वरित 23 अधिकाऱ्याची नावे का वगळली, असा प्रश्न आरटीओतील अधिकाऱ्याकडून उपस्थित होत आहे. याचिकाकर्ते श्रीकांत कर्वे यांनीही नेमका हाच प्रश्न उपस्थित केला आहे. फिटनेस प्रमाणपत्र देताना जर 60 वेगवेगळे अधिकारी अनुपस्थित होते तर मग इतर अधिकाऱ्यावर मेहरबानी का, असा प्रश्न कर्वे यांनी केला.
फक्त निरीक्षकांवर कारवाई का?
वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र दिल्यावर डेप्युटी आरटीओ दर्जाच्या अधिकाऱ्याने एखाद्या वाहनाची अचानक तपासणी करण्याचे आदेश यापूर्वीच परिवहन आयुक्तांनी दिले आहे. नियमबाह्य प्रमाणपत्र देण्याच्या मुद्दय़ावरून 37 मोटर वाहन निरीक्षक व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांना निलंबित केले तर मग फिटनेस तपासण्याची जबाबदारी असणाऱ्या डेप्युटी आरटीओ दर्जाच्या अधिकाऱ्यावर कारवाई का नाही, असा प्रश्नही कर्वे यांनी केले.
नोटीसमुळे घाईघाईत कारवाई
या जनहित याचिकेवरील सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने परिवहन सचिव आशीषकुमार सिंह यांना न्यायालयाच्या बेअदबीची नोटीस दिली आहे. या याचिकेची सुनावणी या महिन्याच्या अखेरीस आहे. त्यामुळे केलेल्या कारवाईची न्यायालयाच्या माहिती देण्यासाठी घाईघाईने 37 जणांचे निलंबन केल्याची आरटीओत चर्चा आहे.































































