
सामना प्रतिनिधी । राहाता
रस्त्याच्या कडेला खुलेआम विक्रीसाठी लावलेले प्लॅस्टिक उत्पादनांचे स्टॉल पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या दृष्टीक्षेपात येताच त्यांनी प्रधान वैज्ञानिक डॉ. अमर सुपाते यांना भ्रमणध्वनीवरुन राहाता येथे कारवाई करण्याचे आदेश दिल्याने या अधिकाऱ्यांच्या पथकासह नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दिवसभर केलेल्या कारवाईत १ लाख ६ हजार रुपयांचा दंड वसूल करत शेकडो किलो प्लँस्टीकही जप्त केले असल्याची माहिती डॉ. अमर सुपाते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र सासनाने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतर उत्पादक, व्यापारी व विक्रेत्यांकडील शिल्लक मालाच्या विल्हेवाटीसाठी शासनाने तीन महिन्यांची मुदत दिली होती. ती १ ऑक्टोंबर २०१८ रोजी संपली. मात्र सर्वत्र प्लॅस्टिकची विक्री चालू असल्याचे निदर्शनास येताच पर्यावरण मंत्रालयाच्या वतीने राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती, महसुल, पोलीस व संबंधित सर्वच विभागांना कायद्याची पायमल्ली करणारे उत्पादक, पुरवठादार, व्यापारी, विक्रेते व ग्राहक यांच्या विरोधात कडक कारवाईचे निर्देश दिलेले आहे.
पर्यावरणमंत्री रामदास कदम बुधवारी शिर्डी मुक्कामी होते. गुरुवार दि.११ रोजी ते नगरकडे जात असतांना राहाता येथे प्लॅस्टिक उत्पादनांची खुलेआम विक्री चालू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आणि पुढील कारवाही सुरु झाली. प्लॅस्टिक विक्रेत्या व्यापाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाई करुन १ लाख ६ हजार रुपयांचा दंड व मुद्देमाल जप्त केला. अचानक झालेल्या या कारवाईने प्लॅस्टिक विक्रेते व्यापारी, स्टॉकिस्ट व ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली.
यावेळी मुख्याधिकारी बारिंद्रकुमार गावित, उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, नगरसेवक सचिन गाडेकर, सागर लुटे, सलिम शहा, भिमराज निकाळे, विजय सदाफळ, बाळासाहेब गिधाड, सचिन मेहेंत्रे,दशरथ तुपे डॉ.स्वाधीन गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.































































