सिंथेटीक ड्रग्जच्या विरोधात विशेष मोहीम राबवणार;अशी मोहीम राबवणारे महाराष्ट्र पहिले राज्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात सिंथेटीक ड्रग्जच्या रॅकेटच्या विरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आहे.  अन्न व औषध प्रशासन,  उद्योग विभाग, पोलीस यांच्या संयुक्त पथकांमार्फत ही मोहीम राबविली जाईल, अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज  विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासांत दिली. नायजेरियन नागरिक मोठय़ा प्रमाणावर ड्रग्जच्या व्यवसायात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

अमली पदार्थविरोधी पथकाने पिंपरी-चिंचवडमध्ये मेफेड्रोन ड्रग्ज जप्त केल्याच्या मुद्दय़ावरून अबू आझमी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेत रवींद्र वायकर, ऍड. आशीष शेलार यांनीही भाग घेतला. वांद्रे (प.) येथील अमली पदार्थांच्या रॅकेटच्या विरोधात सहा वेळा अमली पदार्थांच्या विक्रीच्या विरोधात सहा वेळा तक्रार केली. नशेसाठी केमिकल ड्रग्ज वापरले जातात. अमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई केली तरी ड्रग कंट्रोलचा कायदा वेगळा आहे. त्यामुळे आरोपी सुटतात याकडे आशीष शेलार यांनी लक्ष वेधले तर रवींद्र वायकर म्हणाले की, आयोडेक्सला ब्रेड लावून नशेचे प्रकार जोगेश्वरीच्या मेघवाडी परिसरात सुरू आहेत. त्याच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. समाजाला लागलेले अमली पदार्थाचे व्यसन दूर केले पाहिजे असे वायकर म्हणाले. नायजेरियन नागरिक ड्रग्जच्या व्यवसायात आहेत त्यांना देशाबाहेर का हाकलत नाही, असा प्रश्नाही वायकर यांनी केला.

या चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, राज्यात काही कंपन्यांचे खोकल्याचे औषध हे नशेकरिता घेतले जाते. यावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.नालासोपारा व इतर भागांत नायजेरियन नागरिक मोठय़ा संख्येने आहेत. मुंबईत आल्यावर हे लोक पासपोर्ट व अन्य कागदपत्रे फाडून फेकून देतात. त्यामुळे त्यांना देशाबाहेर पाठवण्यात तांत्रिक अडचणी येतात. त्यासाठी कायद्यात बदल करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येतील असे ते म्हणाले. राज्यात प्रत्येक जिह्यामध्ये सिंथेटीक ड्रग्जविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येईल. अशी मोहीम राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य असेल, असेही देशमुख म्हणाले.