महसूल विभागाने अवैध वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महसूल विभागाने अवैध वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या असून महिन्याभरात सुमारे 150 ब्रास वाळू साठे जप्त केले आहेत. तसेच अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या अनेक वाहनांवर कारवाई करून लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे. याउलट सामान्य नागरिकांमधून सिंगम तहसीलदार विशाल नाईकवाडे व त्यांच्या टीमचे कौतुक केले जात आहे.

जामखे़ड तालुक्यातील खर्डा, सोनेगाव, धनेगाव, वाकी, लोणी भागात मोठय़ा प्रमाणावर अवैध वाळू साठे आहेत अशा काही नागरिकांच्या तक्रारी होत्या. या तस्करांना राजकीय वरदहस्त असलेमुळे कोणतेही अधिकारी कारवाई करण्यास धजत नव्हते. परंतु तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी वाळू तस्करांविरोंधात जोरदार मोहीम उघडली असून अवैध वाहतूक व अवैध साठ्यावर जोरदार कारवाई सुरू केली आहे. वाळू तस्करांनी प्रशासनाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा तहसीलदार यांनी जादा पोलीस बंदोबस्त मागितला व कारवाई केली.

डिसेंबर महिन्यात जवळपास 50 ब्रास वाळू साठे जप्त केले होते. तसेच शनिवारी खर्डा भागातील अवैध वाळू साठे महसूल व पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या जप्त केले. दुपारी 2 वाजता सुरू झालेली ही कारवाई रात्री 12 वाजता संपली. महसूल विभागाने मागील आठवडय़ात वाळू माफिया विरोधात धडक कारवाई करून सहा टॅक्ट्रर व दोन डम्पर वाळूसह जप्त करून धडक कारवाई केली होती. त्यातील तीन वाहनांकडून 5 लाखाचा दंड वसूल करण्यात आला होता.