मिसिंग लिंकवर सेल्फी काढणाऱ्यांना दणका, दोन दिवसांत 30 वाहनांवर कारवाई; सीसीटीव्हीचा चोवीस तास वॉच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकवर सेल्फी काढणाऱ्यांची खैर नाही. महामार्गावर सेल्फी काढण्यास बंदी असतानाही मिसिंग लिंकवर वाहने थांबवून सेल्फी घेणाऱ्यां 30 वाहनांवर गेल्या दोन दिवसांत कारवाई केली गेली. सेल्फी काढणारे पुराव्यासह पकडले जावेत म्हणून मिसिंग लिंकवर सीसीटीव्हीचा चोवीस तास वॉच ठेवण्यात आला आहे.

मिसिंग लिंकचे महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले. ‘मिसिंग लिंकवर वाहनचालकांनी कुठेही थांबू नये, त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो’ असे फलक जागोजागी लावले गेले आहेत. त्यानंतरही अतिउत्साही वाहनचालक केबल स्टेड ब्रिज व बोगद्याजवळ वाहने थांबवत आहेत. अशा वाहनांवर महामार्ग पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरू आहे.

महामार्गावर वाहने थांबवण्यास मनाई असताना त्याचे उल्लंघन करणाऱ्यां वाहनांची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) महामार्ग पोलिसांना दिली जात आहे. सेल्फी, पह्टो आणि रिल काढण्यासाठी थांबू नका नाहीतर मोठय़ा दंडाची आकारणी होऊ शकते. तसेच तुमच्यासह इतरांच्याही वाहनांना धोका होऊ शकतो. या कारणास्तव नियमांचे पालन करा आणि सुरक्षित, सुखकर प्रवास करा, असे आवाहन एमएसआरडीसीने केले आहे.

ताशी 240 किमी वेगाचे वादळही अंगावर झेलणारा टायगर व्हॅलीतील केबल स्टेड पूल

ताशी 130 ते 155 किमी इतक्या प्रचंड  वेगाने राज्याच्या किनारपट्टीवर धडकलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाने अनेक घरांपासून झाडे मुळासकट उन्मळून टाकली होती, पण मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंकवरील टायगर व्हॅलीत तब्बल 125 मीटर उंचीवर उभारण्यात आलेला 650 मीटर लांबीच्या केबल स्टेड ब्रिजवर ताशी 240 किमी वेगाने चक्रीवादळ धडकले तरी या पुलाला जराही धक्का बसणार नाही.

प्रवाशांचे आकर्षण ठरला केबल ब्रिज

सुमारे 7 हजार 181 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या मिसिंग लिंकवरून मोटारी सुसाट रवाना होतात, पण सर्व प्रवाशांचे आकर्षण ठरला आहे तो म्हणजे या मिसिंग लिंकवरील दोन बोगद्यांना जोडणारा टायगर व्हॅलीतील केबल स्टेड पूल.