शिरोळच्या कुरुंदवाड शहरातील अतिक्रमणे हटवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड शहरातील अतिक्रमणावर नगरपालिका प्रशासनाने हातोडा उचलला आहे. अतिक्रमण हटावची सुरुवात पालिका चौकातूनच झाली. जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण हटविताना अतिक्रमण करणाऱ्यांनी आणि व्यापारी असोसिएशने तीव्र विरोध केला. मात्र, मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी विरोध झुगारुन अतिक्रमण हटाव मोहिम सुरुच ठेवली. या मेहिमेचे शहरवासियांतून कौतुक होत आहे. अनेक वर्षाच्या अतिक्रमण हटवल्याने शहराने मोकळा श्वास घेतला आहे.

अतिक्रमण हटाव मोहिम बंद पाडण्यासाठी अतिक्रमण करणाऱ्यांनी जेसीबीसमोर बसून विरोध केला. मुख्याधिकारी व प्रशासनाच्या जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मुख्याधिकारी व स्थानिकांमध्ये वादावादी झाल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिस बंदोबस्तातून अतिक्रमण  हटाव मोहिम सुरुच ठेवल्याने दिवसभरात पालिका चौक ते दर्गा चौक रस्त्याने मोकळा श्वास घेतला. शहरात छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीची कोंडी होत होती. शिवाय गटारीवरच बांधकाम केल्याने अनेक ठिकाणी सांडपाण्याच्या गटारीतील पाणी रस्त्यावर येत होते. त्यामुळे दुर्गंधी पसरून डासांचा प्रादुर्भाव वाढला होता. अतिक्रमण हटाव अशी शहरातील नागरिक करत होते. मंगळवारी दुपारी पालिका चौकातून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली. जेसीबी, दोन ट्रॅक्टर व पालिकेच्या सर्व विभागाचे कर्मचारी, अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते. या मोहिमेत व्यापारी असोसिएशननने विरोध करत मुख्याधिकारी आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत जेसीबी समोरच ठिय्या आंदोलन केले. तसेच असोसिएशने शहरातून निषेध फेरी काढत शहर बंदची हाक दिली होता. मात्र, शहरात या बंदला संमित्र प्रतिसाद मिळाला.

पालिका चौक ते दर्गा चौक या मार्गावरील सर्व अतिक्रमण हटविल्याने शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त होत आहे. या मोहिमेत बांधकाम अभियंता योगेश गुरव, कर विभागाचे नंदकुमार चौधरी, निशिकांत ढाले, राजू गोरे, प्रशासकीय अधिकारी पूजा पाटील, अजित दिपंकर, विक्रम हेगड, सचिन थरकार, आमेल कांबळे, नितीन संकपाळ, अविनाश गोरे, रिजवान मतवाल यांच्यासह पालिका कर्मचारी सहभागी झाले होते.