एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्यांची नोंदणी आणि मासेमारी परवाना रद्‌द करण्याच्या सूचना

1043

एलईडी दिवे लावून होणार्‍या मासेमारीच्या विरोधात गेले अनेक दिवस पारंपारिक मच्छिमार आवाज उठवत होते. मत्स्य व्यवसाय विभागाने एलईडीद्वारे मासेमारी करणार्‍या नौकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाला दिले आहेत. एलईडीद्वारे मासेमारी करताना आढळल्यास नौका नोंदणी प्रमाणपत्र आणि मासेमारी परवाना रद्‌द करण्याच्या कडक सूचना मत्स्यविभागाने दिल्या आहेत.

बेकायदेशीर मासेमारीवर कारवाई करण्याच्या सूचना देणारे नवीन परिपत्रक कृषी पशू संवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागाने सोमवारी प्रसिध्द केले आहे. या नव्या परिपत्रकामुळे बेकायदेशीरपणे मासेमारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. एलईडी दिवे लावून होणार्‍या मासेमारीविरोधात मच्छिमार आवाज उठवत होते. मात्र, प्रशासनाकडून त्यावर योग्य ती कारवाई होत नव्हती. अनेक पर्ससीन नेट मच्छिमार नौका एलईडी दिव्यांचा वापर करत असल्याचे आढळून आले होते. या मासेमारीवर कारवाई करण्याचे सूचना मत्स्यव्यवसाय विभागाच्या वरीष्ठ पातळीवरुन देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही समाधानकारक कारवाई होत नसल्यामुळे मच्छिमार संघटनांनी बेकायदेशीर मासेमारीविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. सोमवारी मत्स्यव्यवसाय विभागाने पुन्हा एकदा परिपत्रक काढून एलईडीद्वारे मासेमारी कंरणार्‍या नौकांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मासेमारी नोंदणी रद्‌द करण्याचे कठोर पाऊल उचलून कारवाई करावी असे नमूद करण्यात आले आहे. अवैध एलईडीच्या सहाय्याने मासेमारी करणारी नौका आणि त्याला सहाय्य करणारी नौका या दोन्ही नौका जप्त करण्याच्या सूचना या परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या