
अहिल्यानगर शहरात बुलेट मोटारसायकलला मॉडिफाइड ‘फटाका’ सायलेन्सर लावून फिरणाऱया वाहनचालकांविरोधात शहर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवून कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत 18 बुलेटचालकांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आजच्या कारवाईदरम्यान आठ बुलेट जप्त करून त्यावरील मॉडिफाइड सायलेन्सर नष्ट करण्यात आले, तर चालकांकडून आठ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
सचिन राजू येमुल, परमेश्वर आढाव, राकेश जाधव, युवराज आढाव, राकेश सपाट, कारभारी माधव शिंदे, सौरभ राजेंद्र ढोकरिया आणि राजेंद्र जिजाबा खरसे यांच्यावर आज कारवाई करण्यात आली. तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱया चार वाहनांवर आणि दारू पिऊन वाहन चालविणाऱया दोन चालकांवर कारवाई करून प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आली आहेत.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱया वाहनचालकांविरुद्ध आजपर्यंत एकूण 87 केसेस नोंदवून 1,01,950 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. बुलेटचालकांनी त्यांच्या वाहनावरील मॉडिफाइड व आवाज करणारे सायलेन्सर तत्काळ काढून टाकावेत, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, अण्णासाहेब परदेशी, संजय गवळी, शामूवेल गायकवाड, कैलास बोटे, मन्सूर सय्यद, रामराव शिरसाठ, गणेश आरणे, सोपान गिरे, झहीर शेख आणि मधुकर ससे यांच्या पथकाने कारवाई केली.



























































