निवडणुकीच्या कामास नकार देणाऱ्या चार मुख्याध्यापकांवर कारवाई, नागपुरात जिल्हा प्रशासनाकडून गुन्हे दाखल करण्याचे आदेश

महानगरपालिका निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांची मदत घेण्यात येते. मात्र निवडणुकीच्या कामात सहभागी न होणाऱया शिक्षकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. निवडणुकीच्या प्रशिक्षणाचे आदेश स्वीकारण्यास नकार देणाऱया चार मुख्याध्यापकांविरोधत गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सदर येथील एम. ए. शेख, ईश्वरनगर येथील डी. जी. धार्मिक, पुष्पा दाभेकर, शांतीनगर येथील जयश्री सलामे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाने 21 डिसेंबर रोजी मतदान अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या होत्या, मात्र या मुख्याध्यापकांनी नियुक्ती पत्र स्वीकारण्यास नकार दिला. तसेच हे मुख्याध्यापक 28 डिसेंबर रोजी आयोजित निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर निवडणुकीचे काम टाळण्याचा प्रयत्न करणारे कर्मचारी आणि अधिकाऱयांमध्ये खळबळ उडाली आहे.

अहिल्यानगरमध्ये 600 कर्मचाऱयांना नोटिसा

अहिल्यानगरमध्ये निवडणुकीच्या प्रशिक्षणाला अनुपस्थित राहणाऱया 450 कर्मचाऱयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याशिवाय निवडणूक प्रक्रियेच्या कामासाठी नियुक्ती दिल्यानंतर ती न स्वीकारणाऱया 150 जणांनादेखील नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेच्या मुख्य निवडणूक अधिकाऱयांनी ही कारवाई केली आहे. महापालिका निवडणुकीसाठी 2,200 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्यासाठी 29 डिसेंबरला प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. दरम्यान, या नोटिसांना जिल्हा माध्यमिक संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांनी आक्षेप घेतला आहे.