संचारबंदीत ‘टाईमपास’ साठी फिरणाऱ्यांकडून 130 वाहने जप्त; ठाणे वाहतूक शाखेची कारवाई

519

संचारबंदीच्या काळातही टाईमपास म्हणून घराबाहेर वाहनाने फिरणाऱ्यांची आता खैर नाही. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी अशा टाईमपास करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील 130 वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये संचारबंदी असतानाही अनेकजण बाईक, स्कूटी तसेच अन्य वाहनाने रस्त्यांवर फिरत असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे खाजगी वाहनचालकांना पेट्रोल मिळणेही बंद झाले आहे. तरीही अनेकजण ब्लॅकने पेट्रोल घेऊन गाड्या चालवत आहेत.

विनाकारण गाडी घेऊन फिरणाऱ्यांविरोधात वाहतूक शाखेने गुरुवारी मोहीम राबवली. या मोहिमेत 122 दुचाकी, सात तीनचाकी , एक चारचाकी अशी वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. कल्याण भिवंडी, ठाणे ,कळवा-मुंब्रा, डोंबिवली, कोळसेवाडी, विठ्ठलवाडी , उल्हासनगर या भागात ही मोहीम राबवण्यात आली. यापुढे विनाकारण गाडी घेऊन फिरणाऱ्यांची वाहने जप्त करण्यात येतील, असा इशारा वाहतूक शाखेचे उपायुक्त काळे यांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या