
सामना ऑनलाईन । कोल्हापूर
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मटका अड्डय़ावर कारवाई करण्यासाठी आलेल्या प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह पोलीस पथकावर जीवघेणा हल्ला करण्यासह मारहाणीत पोलिसांचे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिसकावून आणि पोलिसांवरच रोखून दहशत माजविण्याचा खळबळजनक प्रकार सोमवारी रात्री घडला. याप्रकरणी यादवनगर येथील कुख्यात मटका बुकी सलीम मुल्ला आणि त्याची पत्नी माजी महापौर व राष्ट्रवादीची विद्यमान नगरसेविका शमा मुल्ला यांसह त्यांच्या टोळीची गंभीर दखल राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे या टोळीवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसा प्रस्तावही विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.
नीलेश दिलीप काळे, राजू यासीन मुल्ला, सुंदर रावसाहेब दाभाडे आणि जावेद मुल्ला (सर्व रा. यादवनगर) या फरार झालेल्या चौघांना आज पोलिसांनी अटक केली. यातील तिघांना उसाच्या शेतातून पकडण्यात आले तर सीसीटीव्हीतील चित्रफितीनुसार नीलेश काळे यानेच पोलिसांचे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिसकावून आणि ते थेट पथकावर रोखल्याचे सामोरे आले आहे. त्याच्याकडून हे पळवलेले रिव्हॉल्व्हर आणि काडतुसेही हस्तगत करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलीस जिल्हा अधीक्षक तिरुपती काकडे, स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील उपस्थित होते.


























































