
खलनायकाची भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते अनुपम श्याम यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर मुंबईतील लाईफलाईन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनुपम श्याम यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती नाजूक असून त्यांनी उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन चित्रपटसृष्टीतील अनुपम यांच्या सहकाऱ्यांना केले आहे.
62 वर्षीय अनुपम यांना किडनीचा त्रास असल्याने ते गेल्या काही महिन्यांपासून डायलिसीसवर होते. काही दिवसांपूर्वी मुंबईतील अॅपेक्स किडनी केअर येथे त्यांचे डायलिसीस सुरू असतानाच त्यांना चक्कर आली व ते कोसळले. त्यानंतर त्यांना लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांचे भाऊ अनुराग यांनी अनुपम यांना आर्थिक चणचण असल्यामुळे चांगले उपचार मिळत नसल्याचे सांगितले आहे. ‘मी त्यांच्या मित्र मंडळी व सहकाऱ्यांना त्यांच्या तब्येतीची माहिती दिली आहे. त्यांना मी आर्थिक मदत करण्याचे आवाहनही केले आहे. मला मनोज वाजपेयी यांचा फोन आला होता’, असे अनुराग यांनी सांगितले आहे. अनुराग यांनी सलमान खानच्या बिईंग ह्युमन या संस्थेशी देखील संपर्क साधला आहे.
अनुपम यांनी अनेक मालिकांमध्ये खलनायकाच्या भूमिका केल्या आहेत. तसेच स्लमडॉग मिलेनियर, दस्तक, दुश्मन, जख्म, कच्चे धागे, पाप, हजारो ख्वाईशे ऐंसी, गोलमाल, हल्लाबोल, वाँटेड, पार्झानिया, बँडिट क्वीन, लगान, दिल से, नायक अशा चित्रपटांमध्येही काम केले आहे.

























































