
दाक्षिणात्य मनोरंजन विश्वामध्ये काही काळापूर्वी समांथा रूथ प्रभू आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाच्या बातमीने धक्का बसला होता. आता यात अजून एका प्रसिद्ध जोडीचं नाव जोडलं गेलं आहे. अभिनेता धनुष हा त्याची पत्नी ऐश्वर्यापासून विभक्त झाला आहे.
धनुष याने स्वतःच सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तो लिहितो, 18 वर्षांची साथ, मित्र, भागीदार, पालक आणि एकमेकांचे शुभचिंतक बनून आम्ही प्रगती, समजुतदारपणा, भागीदारीचा एक प्रवास केला होता. आज आम्ही अशा ठिकाणी आहोत, जिथून आमचे मार्ग वेगळे होत आहेत. ऐश्वर्या आणि मी विभक्त व्हायचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांपासून विभक्त होऊन स्वतःचा शोध घेणार आहोत. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आमच्या या खासगी निर्णयाला आत्मसात करू द्या, असं धनुषने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
🙏🙏🙏🙏🙏 pic.twitter.com/hAPu2aPp4n
— Dhanush (@dhanushkraja) January 17, 2022
ऐश्वर्या आणि धनुष यांचा विवाह 2004मध्ये झाला होता. या जोडप्याला दोन मुलं आहेत. त्यांची नावं यात्रा आणि लिंगा अशी आहेत. मध्यंतरीच्या काळात त्यांच्यातील वादांविषयीच्या बातम्या येत होत्या. मात्र, या दोघांनीही माध्यमांच्या प्रश्नांवर उत्तरं दिली नव्हती.
ऐश्वर्या ही ज्येष्ठ अभिनेते आणि सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. तर धनुष हा प्रसिद्ध निर्माता कस्तुरी राजा यांचा मुलगा आहे. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, नर्तक, पार्श्वगायक, गीतकार आणि पटकथा लेखक अशी चतुरस्त्र मुशाफिरी करण्यासाठी धनुष प्रसिद्ध आहे. 46 चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या धनुषच्या नावावर एक फिल्म फेअर पुरस्कार, चार राष्ट्रीय पुरस्कारांसह 13 पुरस्कार आहेत.

























































