
बलात्कार प्रकरणात अभिनेता एजाज खान याला दिलासा देण्यास दिंडोशी सत्र न्यायालयाने नकार दिल्यानंतर त्याने अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. एजाज खानच्या याचिकेवर आज सोमवारी सुनावणी होणार होती. मात्र वकिलाने वैयक्तिक कारणाने सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केल्याने याचिकेवर नियमित खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. त्यामुळे एजाज खानवर अटकेची तलवार कायम राहणार आहे.
‘हाऊस अरेस्ट’ या शोचा सूत्रसंचालक एजाज खान याने शोमधील स्पर्धक अभिनेत्रीवर बलात्कार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पीडितेचा विश्वास संपादन करण्यासाठी सेलिब्रिटी आणि रिऑलिटी शोचे होस्ट म्हणून आपल्या पदाचा गैरवापर करत अभिनेता एजाज खान याने अत्याचार केल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.