ठसा – लीलाधर कांबळी

1455

>> प्रशांत गौतम

ज्येष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी यांच्या निधनाने मालवणी रंगभूमी आपल्या सशक्त आणि दमदार अभिनयाने गाजवणारा प्रतिभावंत कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. खरे तर मालवणी रंगभूमी हे नाव रसिक, जाणकार, अभ्यासकांच्या समोर आले की, अनेक कांबळी आपल्याला आठवतात. मच्छिंद्र कांबळी, दिलीप कांबळी, लवकुश, अविनाश, मंगेश अरुण असे सांगता येईल. याच कांबळी नाम परंपरेतील अव्वल नाव म्हणजे लीलाधर कांबळी यांचे सांगता येईल. मालवणी रंगभूमीस विशाल धर्मगाथा म्हणतात, तर रेवंडी या धर्माची वाराणसी समजली जाते. ही सर्व कांबळी मंडळी म्हणजे रेवंडीने रंगभूमीला दिलेली बाप माणसं आहेत.

9 मे 1937 साली सिंधुदुर्ग जिल्हय़ात मालवण तालुक्यात रेवंडी येथे जन्म झालेल्या लीलाधर कांबळी यांचा व्यावसायिक रंगभूमीवरचा प्रवेश ‘रिप्लेसमेंट’ या भूमिकेतून झाला. अभिनेता होण्याचे त्यांनी ठरवले नव्हते. मात्र जी काही नाटय़कृती ते सादर करीत असत ती मुंबई पोर्ट ट्रस्टमधील नोकरी सांभाळूनच. 1955 मध्ये दहावीची परीक्षा देऊन ते मुंबई पोर्ट ट्रस्टमधील स्टोअर डिपार्टमेंटमध्ये नोकरीला लागले. 1992 साली सेवानिवृत्त झाले. याच दरम्यान त्यांचा नाटय़ प्रवास सुरू झाला.

लीलाधर कांबळी यांनी तीसहून अधिक नाटकांत भूमिका केल्या. पण त्यात लक्षात राहतात त्या भूमिका म्हणजे ‘वात्रट मेले’मधील अप्पा मास्तर, ‘वस्त्र्ाहरण’मधील जोशी मास्तर अशा त्यांच्या गाजलेल्या भूमिका. शुद्ध मालवणी आणि शुद्ध मराठी बोलणारा हा अस्सल प्रतिभावंत कलावंत इंग्रजी रंगभूमीवरही तेवढय़ाच समरसतेने दिसतो, तो भरत दाभोळकरांच्या ‘फनी थिंग कॉल्ड लव्ह’ या नाटकात. कांबळी यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या बळावर इंग्रजी रंगभूमी गाजवली. या नाटय़प्रयोगानेही बघता बघता दोनशेचा टप्पा पार केला. नाटका-नाटकांतून भूमिका करणे हा त्यांचा स्थायीभाव, परंतु नाबाद शतकी आणि द्विशतकी प्रयोग करणे ही तर त्यांची खासियत सांगितली जाते. ‘वात्रट मेले’चे तर दिग्दर्शन त्यांच्याकडे होते, पण नाटकाने दोन हजार प्रयोग केले. मराठी नाटय़ रसिकांसाठी यापेक्षा अभिमानाची बाब आणखी काय असू शकते?

या बहुचर्चित नाटय़प्रयोगांप्रमाणे अखेर तू येशीलच, लेकुरे उदंड जाहली, बे दुणे पाच, चाकरमानी, हसवा-फसवी, शॉर्टकट, प्रेमा तुझा रंग कसा, एक दिवस येईलच, वन रूम किचन, सासू पाहून लग्न करा, आमच्या या घरात, चला घेतला खांद्यावर, जिथे फूल उमलते, कथा नव्या संसाराची, नयन तुझे जादूगार, सगळे मेले सारखेच, शहाण्यांनी खावं बसून, अशीही फसवा फसवी, लफडं सोवळय़ातलं, चंपू खानावळीला अशा एकापेक्षा एक नाटकांतील अनेक भूमिका लीलाधर कांबळी यांनी लोकप्रिय केल्या आहेत.

रंगभूमी गाजवणारा हा कलावंत दूरदर्शनवर छोटय़ा पडद्यावरून घरोघरी पोहचला. भाकरी आणि फुलं, गोटय़ा, बे दुणे तीन, पाऊस मृगाचा पडतो, कथास्तू, पोलिसातला माणूस, गिनीपिंग, हसवणूक, मेवालाल, नव्हे जासूस, (हिंदी) तसेच कॉमेडी डॉट कॉम, चला बनूया रोडपती, गंगूबाई नॉन मॅट्रिक, भाग्यविधाता अशा मराठी, हिंदी मालिकांची नावे आजही रसिक प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. रंगभूमी, दूरदर्शन या माध्यमांप्रमाणे त्यांच्या वाटचालीचा महत्त्वाचा टप्पा सांगायचा म्हणजे मराठी चित्रपट सिंहासन, हल्लागुल्ला, रंगत संगत, आई पाहिजे, सारेच सज्जन, जिगर, बरखा सातारकर, प्राण जाये पर शान न जाये, श्वास, बीज (हिंदी), विता बानो, हंगामा, वन रूम किचन, सुकन्या असा त्यांचा तिन्ही माध्यमातील चौफेर आणि विविधांगी प्रवास सांगता येईल. सातत्याने नाटकात काम करावे लागल्याने लीलाधर कांबळी यांच्या नावावर व्यावसायिकतेचा शिक्का बसला. त्यामुळे राज्य नाटय़ स्पर्धांतील नाटकांपासून त्यांना दूर राहावे लागले. तिन्ही माध्यमांतून भूमिका गाजवणारा हा अस्सल मालवणी कलावंत रंगदेवता, शंकर घाणेकर आणि प्रभाकर पणशीकर, स्मृती राज्य जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित झाला होता. कर्करोगाशी झुंज देत अखेर मुंबईत 83 व्या वर्षी त्यांचा प्रवास थांबला.

आपली प्रतिक्रिया द्या