युगानयुगे ‘गंगा’ एनसीपीएमध्ये हेमा मालिनी यांची नृत्यनाटिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याचे औचित्य साधून राज्य सरकारच्या वतीने  75 नद्यांच्या संवर्धनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.  ‘चला जाणूया नदीला’ असे या अभियानाचे नाव आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांची ‘गंगा’ ही नृत्यनाटिका बघण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना, लेखन, निर्मिती हेमा मालिनी यांची आहे. तर कोरियोग्राफी भूषण लकंद्री यांची आहे. येत्या 19 मार्च रोजी एनसीपीएच्या द जमशेद भाभा थिएटरमध्ये सायंकाळी 6.30 वाजता हा कार्यक्रम होईल.

 गंगा माता जीवनदात्री आहे. भगीरथ प्रयत्नांनी ती पृथ्वीवर अवतरली आहे. ‘गंगा’ नृत्यनाटिकेतून नदीचा युगानुयुगांचा प्रवास दाखवला जाईल. कलियुगातील नदी दुर्लक्षित असून तिला मोठय़ा प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तिच्यावर होत असलेल्या अन्यायाकडे दुर्लक्ष करून शुद्धता आणि पावित्र्य जपण्यासाठी एक आई म्हणून ती आपल्याला विनंती करत आहे, असे नृत्यनाटिकेत दाखवले आहे.

याविषयी हेमा मालिनी म्हणाल्या, या अभियानाच्या माध्यमातून नदीसंवर्धनाबाबत तरुणाईमध्ये जागरूकता निर्माण होईल.  नद्यांची काळजी घेण्यासाठी एकत्रित प्रयत्न करूया. ‘गंगा’ नृत्यनाटिका हे अभियानातील माझे योगदान आहे.