अभिनेत्री प्रिया मराठे हिचे निधन; कर्करोगाशी झुंज अपयशी, वयाच्या 38व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी व हिंदी मालिका, नाटक आणि चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या अभिनेत्री प्रिया मराठे (38) हिचे रविवारी पहाटे मीरा रोड येथे निधन झाले. मागील दोन वर्षांपासून ती कर्करोगाशी झुंज देत होती. अखेर तिची ही झुंज अपयशी ठरली. गुणी अभिनेत्रीच्या अकाली एक्झिटमुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, प्रियाच्या पार्थिवावर सायंकाळी मीरा रोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी अनेक कलाकारांनी साश्रुनयनांनी तिला अखेरचा निरोप दिला.

‘या सुखांनो या’ या मालिकेतून प्रिया मराठे हिने टेलिव्हिजनवर पदार्पण केले होते. ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथं मी’, ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’, ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ यांसारख्या मालिकांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. ‘कसम से’ या मालिकेतून तिने हिंदीत पदार्पण केले. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतील ‘वर्षा’ आणि ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेतील ‘ज्योती मल्होत्रा’ या भूमिकांमुळे ती घराघरात लोकप्रिय झाली. ‘अ परफेक्ट मर्डर’ आणि ‘तिला काही सांगायचंय’ या नाटकांतही तिने काम केले होते.

आजारपणामुळे अर्ध्यावरच सोडली मालिका

तुझेच मी गीत गात आहेया मालिकेतील प्रियाने साकारलेली मोनिका कामत ही निगेटिव्ह भूमिका तुफान गाजली. पण आजारपणामुळे तिने ही मालिका अर्ध्यातच सोडली होती. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिने ही माहिती दिली होती

स्ट्रगलच्या काळात मैत्री ते फिल्मी स्टाईल प्रपोज

स्ट्रगलच्या दिवसांत प्रिया आणि शंतनू मोघे यांची ओळख एका कॉमन मैत्रिणीमुळे झाली होती. पुढे त्यांचे नाते घट्ट मैत्रीत बदलले. विचार जुळायला लागल्यानंतर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. दीड वर्षाच्या डेटिंगनंतर शंतनूने प्रियाला फिल्मी स्टाईलने प्रपोज केले. 24 एप्रिल 2012 रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली. ‘स्वराज्यरक्षक संभाजीया मालिकेत दोघांनी एकत्र काम केले होते. या जोडीने अभिनयासोबत व्यवसायातदेखील पाऊल टाकले. त्यांनी मिळून एक कॅफे सुरू केला होता.