अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vidya-sinha

‘छोटी सी बात’, ‘रजनीगंधा’, ‘पती, पत्नी और वो’ अशा सिनेमांमधून सोज्वळ, सहजसुंदर अभिनयाची छाप सोडणाऱया ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 72 वर्षांच्या होत्या. हृदय व फुप्फुसाच्या आजाराने त्रस्त असलेल्या विद्या सिन्हा यांच्यावर जुहू येथील क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

भूमिकांबाबत चोखंदळ असलेल्या विद्या सिन्हा यांनी तीन दशकांत निवडक सिनेमांमध्ये काम केले. त्यांचे वडील निर्माता असल्याने त्यांचा इंडस्ट्रीत सहज प्रवेश झाला. बासू चॅटर्जी हे त्यांचे मेंटॉर होते. चॅटर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा अभिनय खुलला. त्यांना अमोल पालेकर यांच्याप्रमाणे पडद्यावरचा मध्यमवर्गीय चेहरा अशी ओळख मिळाली. ‘छोटी सी बात’मधली प्रभा, ‘रजनीगंधा’मधली दीपा, ‘पती, पत्नी और को’ सिनेमातील शारदा या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल्या. ‘तुम्हारे लिए’, ‘सफेद झूठ’, ‘मुक्ती’, ‘सबूत’ या सिनेमांतही त्यांनी काम केले. मोठय़ा पडद्यानंतर त्यांनी छोटय़ा पडद्याकडे आपला मोर्चा वळवला. ‘काव्यांजली, ‘कुल्फी कुमार बाजेवाला, ‘भाभी, ‘बहुरानी, ‘कबूल है, ‘चंद्र नंदिनी या टीक्ही मालिकांमध्येही त्यांनी काम केले होते. ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ मालिकेतील त्यांची बेबे ही भूमिका विशेष गाजली होती. मधल्या काळात त्या बॉलीवूडपासून दूर होत्या. मोठय़ा गॅपनंतर त्यांनी सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ चित्रपटात काम केले. विद्या सिन्हा यांचे दोन विवाह झाले होते. व्यंकटेश्वर अय्यर यांना घटस्फोट दिल्यानंतर त्यांनी नेताजी भीमराव साळुंखे यांच्याशी दुसरा निकाह केला होता, मात्र तोही फार काळ टिकला नाही. साळुंखे यांच्या विरोधात त्यांनी मानसिक व शारीरिक छळाची तक्रार दाखल केली होती.