
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईच्या पश्चिम उपनगरात ‘अदानी इलेक्ट्रीसिटी’ कंपनीकडून ग्राहकांना 10 ते 20 टक्के अतिरिक्त वीज बिले आकारण्यात आली. यासंदर्भात हजारो ग्राहकांनी वांद्रे येथील कार्यालयावर निदर्शनेही केली. एमईआरसीनेही यासंदर्भात सुमोटो दाखल करून घेतली असून ‘अदानी कंपनी’ला ग्राहकांची घेतलेली वाढीव बिलाची रिक्कम व्याजासकट परत करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी आज सभागृहात केली. यावर उत्तर देताना ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एमईआरसीने नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर ‘अदानी’ घेतलेली वाढीव बिलांची रक्कम ग्राहकांच्या पुढील बिलांमध्ये व्याजासह ऍडजस्ट केली जाईल, असे आश्वासन दिले.
एमईआरसीने यासंदर्भात सुमोटो याचिका दाखल केली असून त्यालचा अहवाल 30 जूनपर्यंत येणार आहे. कोणत्याही कंपनीला एमईआरसीने ठरवून दिलेल्या दरांपेक्षा अतिरिक्त दर लागू करण्याचा अधिकार नाही. जर अदानी कंपनीने असे अधिक दर लावले असतील तर ते ग्राहकांच्या पुढील वीज बिलांमध्ये व्याजासकट ऍडजस्ट केले जातील, असे ऊर्जा मंत्री म्हणाले. यावर अतुल भातखळकर यांनी हरकती-सूचना नोंदविण्यासाठी समितीचा अहवाल ग्राहकांसाठी खुला करावा, अशी मागणी केली. त्यालाही सकारात्मक उत्तर देताना ऊर्जा मंत्र्यांनी हा अहवाल जनतेसाठी खुला केला जाईल, असे सांगितले.
ग्राहकांकडून घेतलेले जादा पैसे परत करा
उपनगरात विजपुरवठा करणार्या अदानी कंपनीचा मनमानी कारभार सुनील प्रभू यांनी तारांकित प्रश्नाद्वारे सभागृहासमोर आणला. 27 लाख ग्राहकांपैकी 2 लाख 25 हजार ग्राहकांना जादा दराने वीज बिल पाठविण्यात आले. यासंदर्भात नेमलेल्या चौकशी समितीचाही अहवाल आलेला नाही. त्या ग्राहकांकडून घेण्यात आलेले जादा पैसे व्याजाने परत देण्यात यावेत, अशी मागणी प्रभू यांनी केली.
























































