अपुऱ्या पुरवठ्यामुळे अडाणीकडून महागड्या कोळशाची खरेदी

249

कोल इंडियाकडून अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेडला 2008 पासून कोळशाचा अपुरा पुरवठा होत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी अदानीकडून महागड्या कोळशाची खरेदी केली जात असून तयार होणारी वीज महावितरणला पुरवली जात आहे. त्यामुळे कोळशाच्या खरेदीवर आतापर्यंत 400-500 कोटी रुपयांचा झालेला वाढीव खर्च महावितरणकडून वसूल करण्यास महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) अदानीला परवानगी दिली आहे. त्यामुळे हा भार महावितरणवर पडणार असल्याने तो वीज दरवाढीच्या माध्यमातून सामान्य वीज ग्राहकांवर येणार असल्याचे निश्चित झाले आहे.

अदानी कंपनीचा गोंदिया जिल्हय़ातील तिरोडा येथे सुमारे 3300 मेगावॅट क्षमतेचा कोळशावर चालणारा औष्णिक वीज प्रकल्प आहे. त्यामध्ये पाच संच आहेत. या वीज प्रकल्पाला लोहारा कोळसा खाणीतून कोळसा पुरवला जात होता. मात्र कोळशाचा कमी पुरवठा होऊ लागल्याने अदानी कंपनीने संच क्र. 2, 3 साठी पर्यायी मार्गाने जादा दराच्या कोळशाची खरेदी करत वीजनिर्मिती सुरू ठेवली आहे. त्यामुळे येथून तयार होणारी वीज वीजखरेदी करारातील दराच्या तुलनेत जादा आहे. ही फरकाची रक्कम देण्यास महावितरणने आतापर्यंत नकार दिला होता. मात्र आता वीज आयोगानेच वाढीव खर्च देण्याचे आदेश दिल्याने महावितरणवरील आर्थिक भार वाढणार असून त्याची चाट वीज दरवाढीच्या माध्यमातून राज्यातील ग्राहकांना बसणार आहे.

अपिलात जाण्याचा मार्ग बंद

वीज आयोगाने दिलेल्या या आदेशाविरोधात महावितरणला ऍपटेल या केंद्रीय संस्थेकडे अपील करण्याचा अधिकार आहे. पण याआधी जेव्हा वीज आयोगाने अदानीला हा वाढीव खर्च देण्यास नकार दिला होता त्याविरोधात अदानीने ऍपटेलकडे दाद मागितली होती. त्यानुसार अदानीला वाढीव खर्च मंजूर करावा असे आदेश ऍपटेलने वीज आयोगाला दिलेले असून त्यानुसारच हा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे पुढे दाद मागण्याचा महावितरणचा मार्ग तूर्तास बंद झाल्याचे दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या