
अदानी इलेक्ट्रिसिटी व्यवस्थापनाकडून वीज कामगारांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. त्यामुळे वीज कामगार आक्रमक झाले असून अदानी इलेक्ट्रिसिटीविरोधात सोमवारपासून वांद्रे-कुर्ला संकुल येथील कामगार आयुक्त कार्यालयासमोर चार दिवस धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनने पत्रकार परिषदेत दिला. तसेच मागण्या मान्य न केल्यास 8 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संप करण्यात येणार आहे.
अदानी इलेक्ट्रिसिटीमध्ये सात-आठ हजार नियमित आणि कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. त्यांच्या वेतनवाढीबरोबरच विविध मागण्यांसाठी मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनने 2016 मध्ये व्यवस्थापनासोबत केलेल्या सामंजस्य कराराची अंमलबजावणी केली जात नाही. कंत्राटी कामगार, वाहनचालक, सुरक्षा रक्षक, सफाई कामगारांना कायम करणे, कायम कामगाराच्या एका वारसाला नोकरीत सामावून घेणे, रिक्त पदे भरणे, कामगारांच्या आई-वडिलांसाठी वैद्यकीय विमा योजनेंतर्गत उपचार खर्च देणे, कोरोना महामारीत काम करणाऱया कामगारांना 50 लाख रुपयांचे विमा कवच देणे, कोरोनाकाळात कमी केलेल्या कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर घेणे या मागण्यांसाठी 5 ते 8 ऑक्टोबरदरम्यान सकाळी 10.30 ते सायंकाळी 5 या वेळेत कामगार आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार असल्याचे मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, कामगार आयुक्तांनी प्रलंबित मगण्याची सोडवणूक न केल्यास बेमुदत संप करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

























































