हनुमानाच्या तोंडी घुसवलेला ‘बाप’ अखेर काढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिग्दर्शक ओम राऊत याचा चित्रपट आदिपुरुष हा प्रदर्शित होण्याच्या पूर्वीपासून वादात सापडला होता. सुमार दर्जाचे व्हीएफएक्स असल्याने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलावी लागली होती. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील संवादांमुळे नवा वाद निर्माण झाला. या चित्रपटावर चहूबाजूने टीका होऊ लागली. खासकरून हनुमानाच्या संवादांमुळे प्रेक्षक भलतेच नाराज झाले होते. हनुमानाच्या तोंडी ‘बाप’ ऐकून प्रेक्षक उडालेच होते. भरपूर टीका झाल्यानंतर चित्रपटातील संवाद बदलण्यात येतील असं सांगण्यात आलं होतं.

सांगितल्यानुसार हे संवाद बदलण्यात आले आहेत. निर्मात्यांनी चित्रपटातील 5 संवाद बदलले आहेत. आता या बदललेल्या संवादांसह हा चित्रपट दाखवला जात आहे. हे संवाद पूर्णपणे नव्याने चित्रीत केले नसून ते नव्याने डब करण्यात आले आहेत. डब केल्याने चित्रपटात हनुमान नवे संवाद बोलताना दिसतात मात्र त्याच्या ओठांच्या हालचालीवरून ते जुनेच संवाद बोलत असल्याचं स्पष्टपणे जाणवतं. नवे संवाद किती प्रभावी ठरतात हे प्रेक्षक ठरवतील. बदललेल्या संवादामध्ये हनुमान असं बोलताना दिसतात ‘कपड़ा तेरी लंका का, तेल तेरी लंका का, आग भी तेरी लंका की, जलेगी भी तेरी लंका ही.’ थोडक्यात काय तर हनुमानाच्या तोंडी घुसवण्यात आलेला ‘बाप’ शब्द काढण्यात आला असून तुलनेने सामान्य शब्द घालण्यात आले आहे.

कमाईचा आकडा घसरायला लागला

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आदिपुरुष उत्तम कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला जात होता. मात्र ज्या दिवशी चित्रपट प्रदर्शित झाला त्या दिवसापासूनच या चित्रपटाच्या कमाईचा आकडा घसरायला लागला आहे. पहिल्या दिवशी 140 कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने सोमवारी अवघे 16 कोटी कमावले होते. बुधवारी तर हा चित्रपट 10 कोटीच कमवू शकला.