आदित्य नारायणची लगीनघाई! मोजक्या लोकांच्या उपस्थितीत मंदिरात होणार विवाह

प्रसिद्ध पार्श्वगायक आणि सूत्रसंचालक आदित्य नारायण याच्या घरी सध्या लगीनघाई सुरू झाली आहे. ऑक्टोबरमध्ये आपल्या खासगी आयुष्याबाबत खुलासा केल्यानंतर आता आदित्य लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

आदित्य नारायण याने ऑक्टोबर महिन्यात श्वेता अग्रवाल हिच्यासोबतच्या नात्याचा खुलासा केला होता. त्यानंतर आपण लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचंही म्हटलं होतं. मात्र, त्याची तारीख जाहीर करण्यात आली नव्हती.

खासगी विवाह सोहळा

आदित्य आणि श्वेता हे दोघेही येत्या 1 डिसेंबर रोजी एका खासगी सोहळ्यात विवाहबद्ध होत आहेत. एका मंदिरात हा सोहळा होत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी मोजके लोक या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

लग्नानंतर छोटंसं रिसेप्शनही असणार आहे. त्यात जवळचे नातेवाईक, कुटुंबीय आणि मित्रमंडळी सहभागी होणार आहेत. विवाह सोहळा आणि पुढील आयुष्यासाठी आदित्य उत्सुक असून आपल्या नात्याच्या या बदललेल्या पैलुचा अनुभव घेण्याची उत्कंठाही असल्याचं मनोगतही त्याने व्यक्त केलं आहे.

आदित्य आणि श्वेता हे दोघेही 2010मध्ये शापित या चित्रपटाच्या निमित्ताने एकमेकांना भेटले. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. मात्र, आदित्यने कधीच या नात्याबद्दल जाहीर वाच्यता केली नव्हती. लग्नाच्या काही काळ अगोदर त्याने श्वेतासोबतच्या नात्याविषयी माहिती दिली होती.

आपली प्रतिक्रिया द्या