वरळीत आदित्य ठाकरे यांनी जिंकली तरुणाईची मने

सामना ऑनलाईन, मुंबई

घडय़ाळाच्या काटय़ाप्रमाणे 24 x 7 धावणाऱया मुंबईत प्रत्येकानेच काही ना काही उराशी स्वप्न बाळगलंय. या स्वप्नामागे धावणाऱया मुंबईकरांना चांगल्या मूलभूत सुविधा मिळायला हव्यात. मुंबईकरांसाठी चांगले रस्ते, मुबलक पाणी हाच माझा स्वार्थ आहे आणि त्यासाठी मी झटत राहीन असे सांगत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबईकर तरुणाईची मने जिंकली.

‘आदित्य संवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यभर फिरून आदित्य ठाकरे तरुणाईशी संवाद साधत आहेत. कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगर येथील तरुणांच्या मनातील प्रश्न जाणून घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईकर तरुणाईशी वरळीतील एनएससीआय संकुल येथे संवाद साधला. यावेळी एका तरुणाने आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारला, ‘निवडणूक असो नसो लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी तुम्ही सतत दौरे करीत असता. तुम्ही स्वतःकडे लक्ष देता की नाही, तुम्हाला स्वतःसाठी काही वाटतं की नाही?’ या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले, इतरांचे प्रश्न जाणून घेणे आणि त्यातून काहीतरी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणे हे जे काही करतोय हे मी माझ्या स्वतःसाठी करतोय. आज मुंबईकरांना चांगले रस्ते मिळायला हवेत, मुबलक पाणी मिळायला हवे हे जे वाटते ते माझ्यासाठीच. यामध्ये माझा स्वार्थ आहे असे आदित्य ठाकरे यांनी सांगताच एनएससीआय संकुल दणाणून गेले. प्लॅस्टिकबंदी, ट्रफिकची समस्या यासह मुंबईच्या मूलभूत समस्यांविषयी तरुणाईने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनीही मुद्देसूद उत्तर दिले.

मुंबईकरांना आवश्यक सुविधा 24 तास मिळाव्यात

मुंबईतील या कार्यक्रमासाठी प्रियंका चतुर्वेदी याही उपस्थित होत्या. ‘मुंबईचे कोणते वैशिष्टय़ तुम्हाला  अधिक भावते?’ या प्रियंका यांनी विचारलेल्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईकर हा सतत स्वप्नामागे धावत असतो. हे स्वप्न उघडय़ा डोळ्यांनी पाहिलेले असते. कधीही न झोपणाऱया या मुंबईसाठी आवश्यक सुविधाही 24 तास मिळायला हव्यात. नाइट लाइफ ही संकल्पना त्यातूनच पुढे आल्याचेही त्यांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांच्या या संकल्पनेला तरुणाईने भरभरून दाद दिली.

दर्जेदार शिक्षणाचा हक्क हवा!

शिक्षण हक्काचा कायदा आहे त्याप्रमाणेच दर्जेदार शिक्षणाचाही हक्क हवा. विद्यार्थ्यांना काय आवडते ते शिकता यायला हवे. त्यांचा  अधिकाधिक संशोधनावर भर राहील यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे हे सांगतानाच विद्यार्थ्यांना जर खेळात अधिक रस असेल तर त्यामध्ये प्रावीण्य मिळविण्यासाठी त्यांना मदत करायला हवी. मुंबईच्या महापालिका शाळांमध्ये असेच दर्जेदार शिक्षण देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असतो. व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन तर मिळतेच शिवाय फुटबॉल, क्रिकेट, बॉक्सिंग यासारख्या विविध क्रीडा प्रकारांसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जात असल्याचे आदित्य ठाकरे यांनी दर्जेदार शिक्षणाविषयी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या