शॅले हॉटेल्समध्ये चार वर्षांत सर्व वाहने इलेक्ट्रिक, आदित्य ठाकरे यांनी केले कौतुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केल्यानंतर मोठय़ा हॉटेल्सनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू केला आहे. आता शॅले हॉटेल्सने 2025 पर्यंत आपली सर्व वाहने इलेक्ट्रिक वाहने करण्याची योजना आखली आहे. या पुढाकाराचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज कौतुक केले.

शॅले हॉटेल्समार्फत मुंबई आणि पुण्यात हॉटेल्स चालविली जातात. इलेक्ट्रिक वाहनांबाबत आखलेल्या धोरणांची शॅलेचे व्यवस्थापकीय संचालक संजय सेठी यांनी आदित्य  ठाकरे यांना सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत माहिती दिली. शॅले हॉटेल्स 2029 पर्यंत ऊर्जा उत्पादन दुप्पट करणार आहे तर 2031 पर्यंत पूर्णतः नविनीकृत ऊर्जेचा वापर सुरू होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. याबरोबरच रियुज, रिडय़ुस आणि रिसायकल या तत्त्वानुसार ऊर्जा, पाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक विकास साधणार आहे.

आदित्य ठाकरे यांनी यावेळी राज्याच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाविषयी माहिती दिली. मोठय़ा शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहने वापरण्यात येणार असल्याचे सांगितले. पुढील वर्षापासून सरकारमार्फत खरेदी केली जाणारी वाहनेसुद्धा इलेक्ट्रिक वाहने असतील. आता मोठय़ा हॉटेल्सनी इलेक्ट्रिक वाहने वापरावीत असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.

सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरणपूरक सवयी अंगिकारणे ही पृथ्वीसाठीच नव्हे तर स्वतःच्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक बाब आहे. यासाठी राज्य सरकारमार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल.

z आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री