
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील प्रस्तावित सायकल ट्रकचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शहरात सायकल वापरास चालना देण्यास पर्यावरणपूरक आणि सहाय्यभूत ठरेल असा विश्वास राज्याचे पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज व्यक्त केला.
मुंबई मेट्रो लाइन तीनवरील कुलाबा-वांद्रे-सीप्झचा मेट्रोचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक झाली. यावेळी पश्चिम द्रुतगती महामार्गावरील प्रस्तावित सायकल ट्रक आणि मिठी नदी किनारा सुशोभीकरण याबाबतही यावेळी सादरीकरण झाले.
मेट्रोच्या विशेषतः पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला. तसेच टनेलिंगची कामे, पूरनियंत्रण, पंपिंग स्टेशनच्या कामाचाही आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. मिठी नदीची स्वच्छता आणि नदीच्या किनाऱयाचे सुशोभीकरण याबाबतही यावेळी माहिती घेण्यात आली. मुंबई शहरातून वाहणारी ही नदी प्रदूषणमुक्त करण्याबरोबरच तिच्या सुशोभीकरणावर भर देण्यात येत आहे. या बैठकीला एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, माजी राज्यमंत्री सचिन अहिर उपस्थित होते.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने उपस्थित होते. दरम्यान कोरोना व्हॅक्सिन पूर्णतः सुरक्षित असून सर्व पात्र नागरिकांनी न घाबरता लस घ्यावी, असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे.

























































